esakal | पुणेकरांसाठी दिलासादायक; जिल्ह्यात आठ दिवसांपासून सक्रिय कोरोना रुग्णसंख्या स्थिर

बोलून बातमी शोधा

पुणेकरांसाठी दिलासादायक; जिल्ह्यात आठ दिवसांपासून सक्रिय कोरोना रुग्णसंख्या स्थिर
पुणेकरांसाठी दिलासादायक; जिल्ह्यात आठ दिवसांपासून सक्रिय कोरोना रुग्णसंख्या स्थिर
sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : पुणे जिल्ह्यातील सक्रिय (ॲक्टिव्ह) कोरोना रुग्णांची संख्या मागील आठवडाभरांपासून सातत्याने एक लाखांच्या आसपास स्थिर राहू लागली आहे. पुणेकरांसाठी ही बातमी दिलासा देणारी आहे. गेल्या आठवडाभरात सक्रिय रुग्णांच्या संख्येत केवळ ४ हजार २७६ ने वाढ झाली आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी (ता.२०) या रुग्णांची संख्या १ हजार ६१ ने कमी झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील आज अखेरपर्यंतची एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख १ हजार ४६८ झाली आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने संभाव्य रुग्णसंख्येच्या अंदाजाच्या तुलनेत ही रुग्णसंख्या १७ हजार ८६३ ने कमी झाली आहे. आरोग्य विभागाने १८ एप्रिललाच पुणे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या १ लाख १९ हजार ३३१ वर जाईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र १८ एप्रिलला ही संख्या १ लाख ३ हजार ६२० झाली होती. त्यामुळे अंदाजाच्या तुलनेत प्रत्यक्षात १५ हजार ७११ ने रुग्णसंख्या कमी झाली आहे. दरम्यान, १८ एप्रिलला जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या ही ७ लाख २० हजार ४३७ इतकी होईल, असे अनुमान व्यक्त करण्यात आले होते. प्रत्यक्षात या दिवशी ही संख्या ७ लाख २२ हजार ४७६ झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्येत संभाव्य अंदाजापेक्षा केवळ २ हजार ३९ ने वाढ झाली आहे.

हेही वाचा: खळबळजनक! इस्लामपुरात रस्त्यावर विनाकराण फिरणारे 8 जण कोरोना पॉझिटिव्ह

एकीकडे पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली असून दुसरीकडे ऑक्सीजन, रेमडेसिविर यासारख्या उपचारांच्या सुविधांची वाणवा जाणवून लागली आहे. यावर मार्ग काढण्यासाठी आणि कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी किमान तीन आठवड्यांच्या कडक लॉकडाऊनची गरज आहे. या मतावर सर्वच आरोग्य तज्ज्ञांचे एकमत आहे.

- डॉ. सुनील जगताप, साई स्नेह रुग्णालय, कात्रज, पुणे.

आठवडाभरातील सक्रिय रुग्ण

- १४ एप्रिल --- ९७ हजार ९१२

- १५ एप्रिल --- ९८ हजार ४५९

- १६ एप्रिल --- ९९ हजार ४३१

- १७ एप्रिल --- १ लाख ४४४

- १८ एप्रिल --- १ लाख ३ हजार ६२०

- १९ एप्रिल --- १ लाख २ हजार ५२९

- २० एप्रिल --- १ लाख १ हजार ४६८