esakal | बारामतीत तपासण्या वाढल्याने रुग्णसंख्या चारशेच्या घरात

बोलून बातमी शोधा

कोरोना
बारामतीत तपासण्या वाढल्याने रुग्णसंख्या चारशेच्या घरात
sakal_logo
By
- मिलिंद संगई

बारामती : शहर व तालुक्यातील कोरोनाच्या तपासण्यांची संख्या वाढताच आज कोरोना रुग्णांच्या संख्येने चारशेचा टप्पा गाठला. काल केलेल्या 1145 तपासण्यांपैकी तब्बल 394 नागरिक कोरोना पॉझिटीव्ह सापडले आहेत. यात चिंतेची बाब म्हणजे अजूनही 292 जणांचे अहवाल प्रतिक्षेत असल्याने कोरोनाचा उच्चांकी आकडा होण्याची भीती वर्तविली जात आहे.

बारामती तालुक्यातील माळेगाव, सोमेश्वरनगर व मोरगाव येथे स्वॅब तपासणी सुरु केल्यानंतर आज शासकीय तपासण्यांचा आकडा एकदमच वाढला. अधिकाधिक तपासण्या करा या शासननिर्देशानुसार बारामतीत सातत्याने तपासण्या वाढविण्याचा प्रयत्न होत आहे. कालपासून ग्रामीण भागातही तपासणी होऊ लागल्याने आज रुग्णसंख्याही वाढली. आज ग्रामीण भागातील रुग्णांचा आकडा 212 पर्यंत जाऊन पोहोचला.

यातही एक दिलासा देणारी बाब म्हणजे पॉझिटीव्ह येणा-यांमध्ये 90 टक्क्यांहून अधिक लोकांना लक्षणे नाहीत, अनेकांना तर आपल्याला कोरोना झालाय या वर विश्वासच बसत नाही अशी स्थिती आहे. दुसरीकडे ऑक्सिजन बेडची मागणी दोन दिवसात कमी झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.

हेही वाचा: अखेर नादुरुस्त व्हेंटिलेटर तब्बल 8 महिन्यांनी रुग्णसेवेत

श्रायबर डायनामिक्स कंपनीने वैद्यकीय कारणांसाठी पाच ऑक्सिजन सिलिंडर्स नर्सिंग महाविद्यालय वसतिगृहासाठी देऊ केले असून हीसंख्या काही दिवसात दहा सिलिंडर प्रतिदिन करणार असल्याची माहिती कंपनीचे प्लँट हेड जितेंद्र जाधव यांनी दिली. कंपनीच्या वतीने कोविड काळात अधिकाधिक मदत देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले.

बारामतीत कोविड केअर सेंटरची संख्या वाढवली असल्याने लक्षणे नसलेल्या रुग्णांची कसलीही अडचण होणार नाही याची काळजी प्रशासन घेत आहे.

हेही वाचा: कोरोनाविरुध्द एकजुटीने, निर्धाराने लढू : अजित पवार

बारामतीला 30 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर

सिंगापूरस्थित टेमसेक फाऊंडेशनच्या वतीने 250 ऑक्सिजन कॉन्सट्रेटरपैकी 30 कॉन्सट्रेटर बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयास मिळाल्याने त्याचाही एक दिलासा मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आरोग्यमंत्री राजेश टोपे व डॉ. संतोष भोसले यांच्या प्रयत्नातून एकूण 500 कॉन्सट्रेटर महाराष्ट्राला मिळणार आहेत. यात केपजेमिनी इंडिया, सिंगहेल्थ सिंगापूर, ऑलकार्गो प्रा. लि., रत्ना निधी चॅरिटेबल ट्रस्ट, इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्यूमन व्हॅल्यू यांनी सहकार्य केले आहे. मुंबई विमानतळावरील कस्टम विभागानेही ही यंत्रणा वेळेत दवाखान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी त्वरित क्लिअरन्स दिला. खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉ. संतोष भोसले यांचे या सर्व प्रयत्नांबद्दल विशेष आभार व्यक्त केले आहे.