esakal | अखेर नादुरुस्त व्हेंटिलेटर तब्बल 8 महिन्यांनी रुग्णसेवेत

बोलून बातमी शोधा

ventilator
अखेर नादुरुस्त व्हेंटिलेटर तब्बल 8 महिन्यांनी रुग्णसेवेत
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : दुरुस्तीअभावी गेल्या आठ महिन्यांपासून पडून असलेले व्हेंटिलेटर महापालिकेने अखेर सुरु केले आहेत. महापालिकेच्या वेगवेगळ्या रुग्णालयांत ते बसविण्यात आले आहेत. दरम्यान, पीएम केअर योजनेतून पुणे शहरासाठी आणखी तीस व्हेंटिलेटर मिळणार आहेत.

गेल्या वर्षी पीएम केअर योजनेतून ससून रुग्णालयाला मिळालेल्या ८५ व्हेंटिलेटरपैकी ३२ व्हेंटिलेटर नादुरुस्त होते. गेल्या आठ महिन्यांत ते दुरुस्त न केल्याने त्याचा वापर होत नव्हता. एकीकडे व्हेंटिलेटरअभावी अनेक रुग्णांना जीव गमवावा लागत असताना, दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणेच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे हे व्हेंटिलेटर धूळ खात पडून होते. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली आणि नादुरुस्त व्हेंटिलेटरची तत्काळ दुरुस्ती केली.

हेही वाचा: पुण्यात १८ ते ४४ वयोगटासाठी दोनच केंद्र

नादुरुस्त ३२ पैकी २१ व्हेंटिलेटर महापालिकेने ससूनकडून ताब्यात घेऊन ते दुरुस्तीसाठी टाकल्याचे समोर आले होते. तर ससून रुग्णालयाकडून गेल्या आठवड्यात व्हेंटिलेटर दुरुस्त करून वापरण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात आले होते. महापालिकेने दुरुस्त करून घेतलेले २१ व्हेंटिलेटर आता वापरण्यास सुरुवात केली आहे. ८ व्हेंटिलेटर बिबवेवाडी येथील रुग्णालयात बसविण्यात आले असून, उर्वरित व्हेंटिलेटरचे नियोजन सुरू आहे. यातील काही महापालिकेच्या दवाखान्यात, तर काही ससून रुग्णालयाला परत दिली जाणार आहेत.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘‘नादुरुस्त असलेले २१ व्हेंटिलेटर दुरुस्त केले आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घोषित केल्या प्रमाणे पीएम केअरमधून महापालिकेला पहिल्या टप्प्यात ३० व्हेंटिलेटर मिळाले आहेत. तसेच शंकर महाराज मठातर्फे ५ व्हेंटिलेटर मिळाल्याने शहराच्या आरोग्य सेवेसाठी मोठा आधार लाभला आहे.’’

हेही वाचा: सैनिक बोर्डाचे रखडले डिजिटायझेशन