Pune : पिफ महोत्सव रंगणार दोन डिसेंबरपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 International Film in Piff

पिफ महोत्सव रंगणार दोन डिसेंबरपासून

पुणे : ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ (पिफ) दोन ते नऊ डिसेंबरदरम्यान होणार असल्याची घोषणा महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी केली. मात्र, यंदा शहरातील निवडक चित्रपटगृहांमधील सात पडद्यांवर रसिकांना दीडशेहून अधिक भारतीय व विविध देशांतील चित्रपटांचा आस्वाद घेता येईल.

यावेळी महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले व महोत्सवाचे सहसंचालक विशाल शिंदे यांनीही विचार मांडले. डॉ. मोहन आगाशे व डॉ. सतीश आळेकर हेही या प्रसंगी उपस्थित होते.

या पर्वणी संदर्भात पटेल म्हणाले, ‘‘महाराष्ट्र सरकारचा अधिकृत चित्रपट महोत्सव असलेला हा चित्रपट सोहळा या वर्षी मार्चमध्ये होणार होता. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चित्रपटगृहांऐवजी ऑनलाइन स्वरूपात तो झाला.’’

नखाते म्हणाले, ‘‘चित्रपट बघण्यामागचा रसिकांचा दृष्टिकोन विस्तारण्याचा अनुभव या महोत्सवातून येतो. यंदा दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांमधून सर्वसामान्य माणसाला भेडसावणाऱ्या समस्या, नात्यांमधील अनेक रंग, निसर्गतत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न आदींचं दर्शन घडणार आहे.’’ राजेभोसले म्हणाले, ‘‘मराठी चित्रपटांचा विशेष भाग व स्पर्धात्मक विभागातून अनेक आशयघन चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येईल.’’ मगदूम यांनी स्पष्ट केले, की सरकारच्या मार्गदर्शक नियमांनुसार चित्रपटगृहात आयोजन केले जाईल. महोत्सवाचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्यांना गुरुवारपासून ऑनलाइन नोंदणी करता येईल. त्याचप्रमाणे या महोत्सवासाठी नियोजित राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (विधी महाविद्यालय रस्ता), पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन (सेनापती बापट रस्ता) व आयनॉक्स (कॅम्प) या चित्रपटगृहांत सोमवारी (ता. २२) नोंदणी सुरू होईल.

‘मराठी सिनेमा टुडे’ विभागात प्रथम प्रदर्शन

गोत (दिग्दर्शक- शैलेंद्र कृष्णा)

ताठ कणा (दिग्दर्शक- गिरीश मोहिते)

कंदील (दिग्दर्शक- महेश कंद)

मे फ्लाय (दिग्दर्शक- किरण निर्मल)

जीवनाचा गोंधळ (दिग्दर्शक - प्रशांत दत्तात्रय पाडेकर)

जागतिक स्पर्धा विभाग

शुड द विंड ड्रॉप,

इन द शॅडोज, अप्परकेस प्रिंट,

अ कॉमन क्राइम आदी चौदा चित्रपटांचा समावेश.

loading image
go to top