
आमच्याकडे कुणी लक्ष देणार काय?
बालेवाडी : बाणेर येथील मुंबई-बंगळूर महामार्गाजवळच असलेल्या सोसायटीतील नागरिक गेल्या चार वर्षांपासून रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मेटाकुटीस आले आहेत. या भागांमध्ये महापालिकेकडून पाणी नाही, सांडपाणी वाहिन्या नाही, रस्ता नाही, कचरा नेण्यासाठी कोणी येत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.बाणेर येथील मुंबई-बंगळूर महामार्गाजवळच वेस्ट वन हॉरायजन बिल्डिंगजवळ विनायक सोसायटी असून येथे अजून बरीच बांधकामे सुरू आहेत. या भागात रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाले असून महापालिकेकडून या भागात अजून पाणीपुरवठा होत नाही.
सांडपाणी वाहिन्या तसेच कचऱ्याची समस्या आहे. पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्याने जा-ये करणे म्हणजे तारेवरची कसरत असते. चिखलामुळे पायी चालणे, तसेच दुचाकीवरून जा-ये करणे अशक्य होऊन बसले आहे. सेवा रस्त्याचे सगळे पाणी वाहून पार्किंगमध्ये येऊन साठते. त्यामुळे पार्किंगमध्ये ही चालता येत नाही, अशी माहिती विनायक सोसायटीतील रहिवासी सचिन देवरे यांनी दिली. देवरे यांनी २०१८ पासून महापालिकेमध्ये रस्त्यांसंदर्भात अनेक वेळा तक्रार केलेली आहे. पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता हा रस्ता बारा मीटरपेक्षा लहान असल्यामुळे औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येतो. तर क्षेत्रीय कार्यालय अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.
"हा भाग एवढ्या वर्षांपासून महापालिकेमध्ये असूनसुद्धा आम्हाला मूलभूत सुविधा मिळत नाहीत, तर मग अजून गावे महापालिकेमध्ये समाविष्ट कशाला करत आहेत?"- अविनाश मतभावे, नागरिक
"पाणी नाही, रस्ता नाही, कचरा कोणी नेत नाही, ड्रेनेज नाही, पण टॅक्स मात्र भरायचा, हा कुठला न्याय? नियमित टॅक्स भरूनसुद्धा आम्हाला मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे, तरी महापालिकेने आमचा प्रश्न लवकर सोडवावा, ही विनंती." - स्मित सुर्वे, नागरिक