Pune : अटलबिहारी वाजपेयी इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापकांचे निलंबन चुकीचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

suspended

अटलबिहारी वाजपेयी इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापकांचे निलंबन चुकीचे

पुणे : शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी येथील अटलबिहारी वाजपेयी इंटरनॅशनल स्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे यांच्यावरील निलंबनाची कारवाई चुकीची आहे. यामुळे राज्यात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या या शाळेची नाहक बदनामी होऊ लागली आहे. वाबळेवाडी ग्रामस्थांनी लोकसहभागातून घडविलेली शैक्षणिक क्रांती ही राज्याला दिशा देणारी ठरली आहे. तरीसुद्धा केवळ राजकीय सुडबुद्धीतून या शाळेवर चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्याचे सत्र पुणे जिल्हा परिषद प्रशासनाने सुरु केले आहे. त्यामुळे ही चुकीची कारवाई त्वरित थांबवा, अशी मागणी जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे बुधवारी (ता.२४) पत्राद्वारे केली आहे.

जिल्हा परिषदेच्या सोमवारी (ता.२२) झालेल्या सर्वसाधारण सभेत ही शाळा आणि या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे यांच्याविरोधात शिरूर तालुक्यातील काही जिल्हा परिषद सदस्यांनी तक्रारी केल्या होत्या. या विषयाबाबत मला कसलीही कल्पना नव्हती. त्यामुळे सर्वसाधारण सभेत या विषयावर मी बोलू शकलो नाही. या सभेनंतर दुसऱ्याच दिवशी जिल्हा परिषद प्रशासनाने वारे यांना निलंबित केल्याचे समजले. त्यानंतर वाबळेवाडी ग्रामस्थांनी मला या शाळेबाबतची वस्तुस्थिती सांगितली आणि या शाळेवर जाणीवपूर्वक चुकीची कारवाई केली जात असल्याचे निदर्शनास आल्याचे बुट्टे पाटील यांनी आयुष प्रसाद यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

बुट्टे पाटील म्हणाले, ‘‘खरं तर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी सरकारी पातळीवरून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. तरीही शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी सरकार आणि जिल्हा परिषद प्रशासनाला यश येताना दिसत नाही. याउलट वाबळेवाडी ग्रामस्थांनी लोकसहभागातून शैक्षणिक क्रांती घडविली आहे. राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी या शाळेचे कौतुक करत, याच शाळेच्या धर्तीवर राज्यात सुमारे दीड हजार मॉडेल स्कूल (आदर्श शाळा) उभारण्याची घोषणा विधिमंडळात केली आहे. तरीही केवळ राजकीय अभिनिवेश ठेऊन या शाळेवर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे.’’

loading image
go to top