esakal | पुलाचे पाईप चोरुन नेणाऱ्या दोघांना निरगुडसर ग्रामस्थांनी दिले पोलिसांच्या ताब्यात

बोलून बातमी शोधा

crime
पुलाचे पाईप चोरुन नेणाऱ्या दोघांना निरगुडसर ग्रामस्थांनी दिले पोलिसांच्या ताब्यात
sakal_logo
By
डी. के. वळसे पाटील, मंचर

मंचर : निरगुडसर व जवळे (ता. आंबेगाव) या दोन गावांच्या सरहदीवर असलेल्या घोडनदीवरील जुन्या पादचारी पुलाचे लोखंडी पाईप चोरुन भंगारात विकणाऱ्या दोन चोरट्यांचा शोध घेतला. निरगुडसरच्या ग्रामस्थांनी मंचर पोलिसांच्या ताब्यात चोरट्यांना दिले आहे. गावकऱ्यांच्या कामाचे पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे. पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी गावकऱ्यांचे अभिनंदन केले.

हेही वाचा: पुणे मार्केट यार्डात होणार कोविड लसीकरण केंद्र

या प्रकरणी मंचर पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे. सुनील दिलीप पवार व विशाल सखाराम किर्वे (दोघे रा. निरगुडसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पादचारी जुन्या पुलाचे एका बाजूचे सर्व लोखंडी पाईप चोरट्यांनी चोरून नेले होते. सतत होणाऱ्या चोरीमुळे जवळे व निरगुडसरचे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. काही गावकऱ्यांनी रात्रीच्या वेळी पुलाच्या परिसरात पाळत ठेवण्याचे काम केल्यामुळे चोरटे गावकऱ्यांच्या जाळ्यात अडकले.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (ता. १९) रात्री ९ च्या सुमारास निरगुडसर गावाच्या हद्दीत असलेल्या जुन्या पादचारी पुलाचे लोखंडी पाईप तोडल्याचा आवाज जवळे येथील युवराज खालकर यांना आला. त्यांनी निरगुडसरच्या ग्रामस्थांना सदर माहिती कळविली. पोलिस पाटील विठ्ठल वळसे पाटील, निरगुडसरचे महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष युवराज हांडे, माजी उपसरपंच दादाभाऊ टाव्हरे यांनी पुलाजवळ येऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांना सुनील पवार व विशाल किर्वे हे मोटरसायकलवरुन लोखंडी पाईप व अँगल पारगाव येथील भंगार दुकानात विकण्यासाठी घेऊन गेले असल्याचे समजले. हांडे व टाव्हरे यांनी पारगाव येथील भंगार दुकानात जाऊन पाहणी केली. अँगल व पाईप पुलाचे असल्याचे आढळून आले. पाईप चोरणारे चोरटे गाडी व पाईप टाकून पळून गेले होते. मंचर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश शेडेकर व ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करुन पंचनामा केला आहे. चोरट्यांनी १ हजार ८०० रुपये किंमतीचे लोखंड चोरुन नेले असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिस पाटील वळसे पाटील यांनी पवार व किर्वे यांच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस नाईक सोमनाथ वाफगावकर करत आहे.

हेही वाचा: जुन्नर : आचाऱ्याचा खून करणारा अल्पवयीन मुलगा गुन्हे शाखेच्या ताब्यात