esakal | जुन्नर : आचाऱ्याचा खून करणारा अल्पवयीन मुलगा गुन्हे शाखेच्या ताब्यात

बोलून बातमी शोधा

crime

जुन्नर : आचाऱ्याचा खून करणारा अल्पवयीन मुलगा गुन्हे शाखेच्या ताब्यात

sakal_logo
By
सिद्धार्थ कसबे, पिंपळवंडी (ता. जुन्नर)

पिंपळवंडी : चाळकवाडी (ता. जुन्नर) येथील पुणे-नाशिक महामार्गावरील मल्हार हॉटेल येथे आचारी म्हणून काम करत असलेले गोरख विठ्ठल गुंड (वय ३०) यांच्यावर आठ एप्रिल रोजी त्यांच्याच हॉटेलमध्ये काम करत असलेल्या अल्पवयीन मुलाने मध्यरात्रीच्या सुमारास धारधार हत्याराने वार करून त्यांना जखमी केले होते. यात गोरख गुंड यांचा उपचारा दरम्यान नगर येथे मृत्यू झाला. या संदर्भात आळेफाटा पोलिस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार मल्हार हॉटेल येथे वेटरचे काम करणाऱ्या सागर सुभाष भोईर याने आळेफाटा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती.

हेही वाचा: Corona सक्रीय रुग्णांमध्ये बंगळूर अव्वल, पुणे दुसऱ्या स्थानावर

गोरख गुंड हे हॉटेलचे मुख्य आचारी होते व त्यांच्या हाताखाली वेटर सागर भोईर व हेल्पर अल्पवयीन मुलगा हे काम करत होते. आठ एप्रिल रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास मल्हार हॉटेल मधील काउंटर समोर फिर्यादी व हॉटेल मधील हेल्पर असे झोपले असता आरोपी याने उठून हॉटेल मधील स्टाफ रूममध्ये झोपलेले आचारी गोरख विठ्ठल गुंड यांच्या खोलीचा दरवाजा वाजवून गोरख गुंड यांना हॉटेलमधील किरकोळ वादाच्या कारणावरून त्यांच्यावर धारदार हत्याराने त्यांच्या डोक्यात तसेच अंगावर वार करून पळून गेला होता.

सदर दाखल गुन्ह्यातील जखमी गोरख गुंड औषधोपचारा दरम्यान मृत झाल्याने सदर गुन्ह्यास भा. द. वि. कलम ३०२ हे कलम लावण्यात आले. आरोपीच्या नावा व्यतीरिक्त काहीही नाव व पत्ता माहित नसल्याने सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणे अवघड होते. सदर इसम हा मोबाईलचा वापर करत नसल्याने तो पुर्वी काम करत असलेल्या विविध ठिकाणांचा शोध घेऊन त्याचे सोबत काम करणारे इतर वेटर यांचे कडून त्याचे गाव, नातेवाईक यांची माहिती घेऊन गुन्हे शाखेचे पथक आरोपीचा शोध घेत असताना पथकास सदर गुन्ह्यातील इसम हा गुन्हा करून ओतुर बाजूकडे पळून गेल्याचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली. बातमीच्या अनुषंगाने ओतुर एस. टी. स्टॅन्ड परिसरात विधी संघर्षीत बालक मूळ राज्य मध्य प्रदेश यास ओतूर एस. टी. स्टँड येथून ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपी हा विधी संघर्षीत बालक असल्याचे निष्पन झाल्याने त्यास पुढील कार्यवाही करीता आळेफाटा पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे सुचना व मार्गदर्शना खाली सह पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलिस नाईक, दिपक साबळे, पोलिस नाईक राजू मोमिन,संदिप वारे, निलेश सुपेकर, पोलिस मित्र प्रसाद पिंगळे आदींनी केलेली आहे.

हेही वाचा: बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर