पुण्यातील नाट्यगृहे अडकली समस्यांच्या गर्तेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Auditorium
पुण्यातील नाट्यगृहे अडकली समस्यांच्या गर्तेत

पुण्यातील नाट्यगृहे अडकली समस्यांच्या गर्तेत

- महिमा ठोंबरे

पुणे - महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक राजधानी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील नाट्यगृहांची (Pune Auditorium) सध्या दुरावस्था (Bad Situation) झाली आहे. महापालिकेच्या (Municipal) ताब्यातील सर्वाधिक वापरात असणाऱ्या बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, गणेश कला क्रीडा मंच या नाट्यगृहांना अस्वच्छता, पार्किंग आदींशी संबंधित समस्यांनी ग्रासले आहे. प्रत्येक समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागत असल्याने लहानसहान समस्या सुटण्यासाठीही वेळ लागतो आहे. मात्र, यांमुळे रंगकर्मी आणि प्रेक्षकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

बिबवेवाडी येथील अण्णाभाऊ साठे स्मारकातील ध्वनीक्षेपक काही महिन्यांपूर्वी चोरीला गेले होते. अनेकदा पाठपुरावा करूनही नव्या ध्वीक्षेपकांसाठी निविदा काढण्याचा मुहूर्त अद्याप विद्युत विभागाला सापडलेला नाही. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील पार्किंगचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. बालगंधर्व रंगमंदिरातील स्वच्छतागृहांमध्ये तर अस्वच्छतेने कळस गाठल्याची तक्रार अनेक कलाकारांनी केली आहे. बालगंधर्व आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील या समस्या सुटण्यास किमान एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. मात्र, यांमुळे मे महिन्याचा सांस्कृतिक कार्यक्रमांचा हक्काचा हंगाम या समस्यांच्या चक्रातच अडकण्याची भिती निर्माण झाली आहे.

याबाबत नाट्यनिर्माते श्रीपाद पद्माकर म्हणाले, ‘‘बालगंधर्व रंगमंदिरात डासांचा प्रचंड प्रमाणात त्रास जाणवतो. विशेषतः रात्रीच्या प्रयोगांना हा त्रास असह्य होतो. महापालिकेने याबाबत युद्धपातळीवर तोडगा काढला पाहिजे. अण्णाभाऊ साठे स्मारकात इतर सुविधा उत्तम आहेत. मात्र साउंड सिस्टिमची व्यवस्था निर्मात्यांना स्वतःलाच करावी लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसतो. हा खर्च खरेतर परवडत नाही, परंतु पर्याय नसल्याने नाईलाजाने हा खर्च करावा लागतो आहे.’’

याबाबत महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे म्हणाले, ‘‘ही नाट्यगृहे महापालिकेच्या ताब्यात असली तरी केवळ स्वच्छता आणि आरक्षणे याच बाबी सांस्कृतिक विभागाच्या अखत्यारित येतात. परंतु, देखभाल व दुरुस्तीच्या बाबतीत आम्हाला भवन आणि विद्युत विभागावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे किरकोळ दुरुस्ती असली तरी देखील या विभागांना त्याबाबत माहिती देत नियमानुसार प्रक्रिया राबवावी लागते. त्यामुळे कधी कधी या प्रक्रियेसाठी वेळ लागतो.’’

समस्यांची यादी -

- बालगंधर्व रंगमंदिरातील स्वच्छतागृहांची दुरावस्था

- रंगमंदिराच्या परिसरात अस्वच्छता

- यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार्किंगसाठी अपुरी जागा

- बिबवेवाडी येथील अण्णा भाऊ साठे स्मारकात ध्वनीक्षेपकच नाही

- गणेश कला क्रीडा मंच सभागृहात ठेकेदाराकडून तोंडी आदेशावर कामे

Web Title: Theaters Stuck In The Pit Of Problems Lack Of Basic Amenities

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneDevelopmentTheater
go to top