
उंड्री : शाळा आणि दुकानाची सामाईक भिंत फोडून चोरट्यांनी ज्वेलर्सच्या दुकानातून चांदीचे दागिने आणि दुकानातील डीव्हीआरही चोरुन नेणाऱ्या अज्ञात चोरट्यावर कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार उंड्री येथील न्यू खिमंडे ज्वेलर्स या दुकानात शनिवारी रात्री साडेआठ ते रविवारी सकाळी १० वाजेच्या दरम्यान घडला. याप्रकरणी मालमसिंह पिरसिंह राठोड (वय ४२, रा. शिवशंभुनगर, कोंढवा यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, राठोड यांचे उंड्री चौकात न्यु खिमंडे ज्वेलर्स हे दुकान आहे. या दुकानाची व शाळेची सामाईक भिंत आहे. शनिवारी रात्री ते दुकान बंद करुन घरी गेले होते. रविवारी सकाळी त्यांनी दुकान उघडले. तेव्हा हा प्रकार समोर आला. चोरट्यांनी शाळेची व दुकानाची सामाईक भिंत तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील ४९४० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व डीव्हीआर असा एकूण ३ लाख ११ हजार ४०० रुपयांचा माल चोरुन नेला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वान पथकाच्या साहाय्याने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक वगरे तपास करीत आहेत.