पुणे शहरातील चोऱ्यांचा तपास ‘राम भरोसे’

पांडुरंग सरोदे
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

गुन्हे पद्धतीच्या अभ्यासावरून घेणार शोध
शहरातील सर्व प्रकारच्या चोरीच्या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेकडून गुन्हेगारांची इत्थंभूत माहिती गोळा केली जात आहे. त्यामध्ये गुन्हेगारांची पार्श्‍वभूमी, सराईत गुन्हेगार, कोणत्या भागामध्ये, कोणत्या वेळेत व कोणत्या प्रकारच्या चोऱ्या होत आहेत, याचा पोलिस अभ्यास करीत आहेत. त्यांची गुन्हे करण्याची पद्धत समजून घेऊन कारवाई करण्यावर भर दिला जाणार आहे.

पुणे - शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये घडणाऱ्या घरफोडी, जबरी चोरी व अन्य चोरीच्या घटनांच्या तपासाबाबत पोलिस ठाण्यांच्या पातळीवर कमालीची उदासीनता आहे. विशेषतः वाहनचोरीच्या गुन्ह्यांकडे पोलिसांकडून गांभीर्याने पाहिलेच जात नाही. चोरीच्या घटनांच्या तपासामध्ये २०१८ च्या तुलनेत मागील वर्षी घसरण झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उन्हाळा, दिवाळी, नाताळ, नववर्ष किंवा अन्य कोणत्याही सणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांच्या घरी चोऱ्या होण्याचे प्रकार दरवर्षी घडतात. मात्र, मागील काही वर्षांपासून केवळ मोठ्या सुट्यांमध्येच नाही, तर काही तासांसाठी नागरिक घराबाहेर पडल्यानंतरही रात्रीबरोबरच भरदिवसाही चोरी करण्याच्या घटना घडत आहेत. घरफोडी व जबरी चोरीच्या घटनांमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी पै-पै जमा करून ठेवलेली रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांकडून लंपास केले जातात. त्यामुळे नागरिकांना घरखरेदी, घरबांधणी, मुलांचे शिक्षण, लग्न, आजारपणाची तजवीज करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर दुसरीकडे नोकरी, व्यवसाय व दैनंदिन आयुष्य अवलंबून असणाऱ्या वाहनांची चोरी होत असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ होत असल्याची सद्यःस्थिती आहे.

डीएसकेंच्या संपत्तीचा लिलाव करण्याबाबत 93 हरकती, सूचना

२०१८ या वर्षी चोरीच्या ३८ टक्के घटनांचे गुन्हे उघड करण्यात आले होते. त्या तुलनेत मागील वर्षी गुन्हे उघड करण्याचे प्रमाण कमी झाले. २०१९ मध्ये चोरीचे गुन्हे उघड करण्याचे प्रमाण ३४ टक्‍क्‍यांवर आले.

शहरामध्ये २०१९ मध्ये चोऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. राज्यात चोऱ्यांचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण २४  टक्के इतके आहे. त्या तुलनेत पुणे शहराचे प्रमाण ३४ ते ३८ टक्के इतके आहे. हे गुन्हे कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.
- अशोक मोराळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: theft inquiry issue in pune city