esakal | पुण्याच्या ग्रामीण भागात होतेय कांदा बियाणांची चोरी
sakal

बोलून बातमी शोधा

theft of onion seeds

पुण्याच्या ग्रामीण भागात होतेय कांदा बियाणांची चोरी

sakal_logo
By
चंद्रकांत घोडेकर, घोडेगाव

घोडेगाव : कांदा चोरी नंतर आता कांदा बियाणे  चोरीचे प्रकार घडू लागले आहेत. शेतात कांदा बियाणे तयार करण्यासाठी लावलेली डेंगळयांला आलेले बियाणे चोरीला गेल्याचा प्रकार नारोडी (ता. आंबेगाव) येथे घडला आहे. अज्ञात चोरटयांनी बियाणे चोरून नेल्याची तक्रार शेतकरी विजय पवार  यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात  दिली आहे. अलिकडे कांदा बियाणाला भाव वाढल्याने डेंगळे चोरीच्या घटना वाढल्या आहेत. बराखीतून कांदा चोरून नेल्याच्या घटना तसेच कांदयाचे रोप चोरून नेल्याच्या घटना सतत घडतात. मात्र मागीलवर्षी कांद्याला चांगला भाव राहिल्याने यंदा शेतकरी कांदा बियाण्यांसाठी लावलेली डेंगळयांची फुले (कांदयाची बोंडे) चोरून नेवू लागले आहेत. यावर्षी कांदा लागवड वाढणार आहे म्हणून अनेक शेतकऱ्यांनी शेतात कांदा बियाणांसाठी डेंगळे लावले आहेत. त्यात थंडी व गर्मीतील चढ-उतारामुळे तसेच अवेळी पडलेला पाऊस यामुळे अनेक शेतक-यांच्या डेंगळयांमध्ये बियाणे नीट उगवली नाहीत. त्यामुळे यावर्षी कांदा बियाणांची टंचाई जाणवणार आहे. यासाठी आत्ता पासूनच शेतकरी कांदा बी विकत घेवून ठेवत आहे.

हेही वाचा: वरवंड येथील तिघांचा कोरोना संसर्गाने मृत्यू

सध्या कांदा बियाणाला तीन हजार ते साडेतीन हजार रूपये किलो भाव सुरू आहे. हा भाव पाच हजार रुपये किलो पर्यंत जाण्याची शक्यता आहे. नारोडी येथील विजय बबनराव पवार यांनी सात गुंठयात केलेल्या संपूर्ण डेंगळयांची चोरी अज्ञात चोरटयांनी केली आहे. तीन महिन्यांचे पक्व झालेले व काढणीस आलेली डेंगळयांची मध्यरात्रीच्या सुमारास अतिशय शिताफिने कटरच्या सहाय्याने तोडून चोरून केली आहे.

हेही वाचा: ऐकावं ते नवलंच! बोकडासाठी व्यावसायिक कोर्टात; पोलिसांविरोधातच दाखल केला दाव

दरम्यान, या सात गुंठयातून अंदाजे पंधरा किलो कांदा बियाणे निघाले असते . आजचा बाजार भाव पहाता यातून पन्नास हजार रूपयांचे कांदा बी तयार झाले असते. मात्र चोरटयांनी चोरून नेल्याने कांदा लावण्यासाठी सुध्दा बी राहीले नाही .तरी चोरटयांना पकडले जावे अशी मागणी शेतकरी विजय पवार यांनी केली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार करत आहेत.