Video : 'तो' दोन्ही पायांनी अपंग; पण, पाहा कशी करतोय चोरी !

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 December 2019

गुजरातमधील एका दुर्गम भागातील ओढ्याच्याकडेला असलेल्या झोपडीत तो राहायचा. दोन्ही पायांनी अपंग असूनही त्याने गुजरातमधीलच एका हिऱ्याला पैलू पाडण्याच्या कारखान्यात काही वर्ष काम केले. तेथून तो पुण्यात आला आणि त्याने थेट दुकान फोडून दिड लाखांची चोरी केली. मात्र समर्थ पोलिसांनी त्याचा माग काढत अखेर बेड्या ठोकल्या.

पुणे : गुजरातमधील एका दुर्गम भागातील ओढ्याच्याकडेला असलेल्या झोपडीत तो राहायचा. दोन्ही पायांनी अपंग असूनही त्याने गुजरातमधीलच एका हिऱ्याला पैलू पाडण्याच्या कारखान्यात काही वर्ष काम केले. तेथून तो पुण्यात आला आणि त्याने थेट दुकान फोडून दिड लाखांची चोरी केली. मात्र समर्थ पोलिसांनी त्याचा माग काढत अखेर बेड्या ठोकल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

विजयभाई जिलिया (वय 20, रा. नवसारी, गुजरात) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रास्ता पेठेतील पॉवर हाऊस चौकामध्ये "न्यु हॅलो मोबाईल शॉपी' हे दुकान आहे. या दुकानाचे शटर उचकटून दुकानातील रोख रक्कम व मोबाईल असा दिड लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता.

ही घटना 30 नोव्हेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, पोलिस कर्मचारी सुशील लोणकर, संतोष काळे, राजस शेख, प्रमोद टिळेकर, निलेश साबळे, साहिल शेख यांच्या पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही चित्रीकरणामध्ये चोरटा हा अपंग असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील चित्रीकरण तपासून आरोपीचा माग काढला. त्यावेळी तो पुणे स्टेशनच्या दिशेने गेल्याचे व तेथून पुढे मुंबईला गेल्याचे दिसले.

महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये विनायक मेटेंना मिळाली 'ही' संधी

त्यानंतर, पोलिसांनी मुंबई येथे जाऊन तेथूनही आरोपीचा शोध घेतला. त्यावेळी तो रेल्वेने गुजरातला निघून गेल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार उपलब्ध माहिती, सीसीटीव्ही चित्रीकरण व अन्य पुराव्यांच्या आधारे पोलिस गुजरातमधील नवसारी येथे पोचले. त्यानंतर तेथील दुर्गम भागातील एका ओढ्याच्या काठावर उभारलेल्या झोपडीमध्ये राहात असल्याचे पोलिसांनी पाहीले. तेथून त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून रोख रक्कम व मोबाईल असा सव्वा लाखाचा ऐवज जप्त केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft by Physically handicapped person in Pune