येडगाव धरण जलाशयातील कृषी उपसा जलसिंचन योजनेच्या विज पंपाच्या केबलची चोरी

येडगाव धरण जलाशयातील कृषी उपसा जलसिंचन योजनेच्या विज पंपाच्या केबलची चोरी

नारायणगाव : येडगाव धरण जलाशया जवळ असलेल्या दोन देवळे येथील जलाशयात असलेल्या तेरा कृषी उपसा जलसिंचन योजनेच्या विज पंपाच्या केबल मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. या मुळे शेतकऱ्यांचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आर्थिक अडचणीत असताना केबल चोरी झाल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मागील तीन वर्षात या भागातील शेतकऱ्यांच्या लाखो रुपये किंमतीच्या  केबलची पाच वेळा चोरी झाली आहे.या प्रकरणी नारायणगाव पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात वेळोवेळी तक्रारी देण्यात आल्या आहेत. मात्र पोलिसांना अद्याप या चोरट्यांचा छडा लागला नाही.शेतकरी वर्ग अडचणीत असताना वारंवार केबल चोरी होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. केबल चोरट्यांचा छडा लावून या मानव निर्मित संकटातून मुक्तता करावी.अशी मागणी माजी सरपंच गुलाबराव नेहरकर व शेतकऱ्यांनी  केली आहे.

या बाबत नेहरकर म्हणाले येडगाव धरण जलाशय परिसरातील इंदिरानगर,कैलासनगर, हांडे मळा, गणेशनगर,दोन देवळे येथे सुमारे चारशे कृषी उपसा जलसिंचन व नळ पाणीपुरवठा योजनेच्या वीज मोटारी आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये इंदिरानगर येथील ५५ कृषी उपसा जलसिंचन योजनेच्या केबल जाळून त्या मधील तांबे धातूची तार अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली होती.या  मुळे  शेतकऱ्यांचे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले होते. त्या नंतर शेतकऱ्यांनी नवीन केबलची जोडणी करून  कृषी पंप सुरू केले .मंगळवारी (ता. ६) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोन देवळे येथील जलाशयात असलेल्या शरद नेहरकर, सुजित धमक, प्रवीण नेहरकर, विजय जोरे, अरुण भोर यांच्यासह तेरा शेतकऱ्यांच्या  कृषी पंपाच्या सुमारे पाच लाख रुपये किमतीच्या केबल चोरून नेल्या. या बाबतची माहिती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांना दिल्या नंतर बिट अंमलदार केंगले यांनी आज दुपारी घटनास्थळी जाऊन पहाणी केली.

मागील वर्षभरात गारपीट, चक्रीवादळ, अतिवृष्टी याचा सर्वाधिक फटका या भागातील शेतकऱ्यांना बसला आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना केबल चोरीचा वारंवार आर्थिक फटका बसत आहे. पोलिसांनी या चोरीचा तपास करावा. या प्रकरणी परिसरात मासेमारी करणाऱ्यांची चौकशी करावी.-गुलाबराव नेहरकर (माजी सरपंच येडगाव) 

(संपादन : सागर डी. शेलार)
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com