अशी असावी सोसायटीची सुरक्षा व्यवस्था

Security
Security

पुणे - गेल्या वीस-तीस वर्षांत पुण्यात गृहसंस्था स्थापनेची संकल्पना चांगलीच रुजली. कोथरूड, बावधन, प्रभात रस्ता, कर्वेनगर, बिबवेवाडी, कल्याणीनगर, विमाननगर वगैरे भागात दिवसागणिक गृहसंस्थांच्या संख्येत वृद्धी होत आहे. गृहसंस्थेत सुरक्षारक्षकाची नेमणूक करूनही पुण्यात राहत्या घरी वा बंद सदनिकेत चोऱ्या, खून वा तत्सम गुन्हे होण्याचे प्रकार वाढत आहेत. हे प्रमाण आटोक्‍यात आणण्यासाठी सुरक्षा व्यवस्था जास्तीत जास्त सतर्क आणि कडक करणे गरजेचे आहे.  

दुर्दैवाने हे सुरक्षारक्षक अभावानेच प्रशिक्षित वा शारीरिकदृष्ट्या सक्षम असतात. अपुरे काम आणि अपर्याप्त देखरेखीमुळे वेळीअवेळी चहा, खाण्यापिण्याच्या निमित्ताने जागा सोडून जाणे, मोबाईलचा सतत वापर,  जवळपासच्या सुरक्षारक्षकांबरोबर गप्पा मारणे, कामाच्या वेळात सभासद वा इतरांची खासगी कामे करणे, कामाच्या वेळेत झोपणे वगैरे प्रकार सुरक्षारक्षकांकडून सातत्याने घडतात. अशा आकार्यक्षम सुरक्षाव्यवस्थेमुळे पोलिस यंत्रणेवरचा ताण तर वाढतोच; पण संस्थेमधील रहिवाशांना, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना, असुरक्षित वाटते. सुरक्षारक्षकांची नेमणूक ही केवळ एक निभावलेली औपचारिकता ठरून रहिवाशांमध्ये त्यांच्या पैशाचा योग्य विनियोग होत नसल्याची भावना निर्माण होते. या सर्वांचा साधकबाधक विचार करून सुरक्षारक्षकाच्या निवड प्रक्रियेसाठी काही मूलभूत मार्गदर्शक तत्त्वे पद्धतशीरपणे अमलात आणणे गरजेचे असते.

सर्वप्रथम सुक्षारक्षकाकडून अपेक्षित असलेल्या सर्व कामांची जंत्री करून त्याची नेमणूक आवश्‍यक आहे. याबाबत सर्वानुमते निर्णय घ्यावा आणि त्यानुसार सुरक्षा व्यवस्था पुरवणाऱ्या चार ते पाच संस्थांची माहिती एखाद्या निःपक्षपाती त्रयस्थाकडून मिळवून त्या सर्वांना लेखी व सविस्तर पाठवून एका ठराविक दिवसापर्यंत सीलबंद पाकिटात निविदा मागवाव्यात. या निविदा सर्व संबंधितांसमक्ष एकाच वेळेस उघडून त्यांची रीतसर नोंद व छाननी करावी.

सर्व निविदांतील नियम, अटी व आर्थिक मोबदल्याचा तुलनात्मक अभ्यास करून यातील किमान मोबदल्याच्या दोन संस्थांच्या इतर जागेवरच्या कामाची पाहणी करून त्या संस्थांच्या आशिलांचे मत मिळवावे. त्यानंतरच सर्वांत स्वस्त ठरलेल्या दोन संस्थांशी मोबदल्याविषयी बोलणी करावी. यातून निश्‍चित झालेल्या संस्थेबरोबरच तसा करार करावा. ज्यात कामातील प्रत्येक त्रुटीसाठी दंडाची तरतूदही करता येते. सुरक्षारक्षकाची कामाची वेळ १२ तासांहून जास्त नसावी. तसेच त्याच्या निवाऱ्याची कोणतीही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष जबाबदारी गृहसंस्थेची नसावी. परप्रांतीयांबाबत ही शक्‍यता जास्त असल्याचे सर्वश्रुत आहे.

सर्व कायम व बदली सुरक्षारक्षकांची पॅन व आधार कार्ड व पोलिस व्हेरीफिकेशन रिपोर्ट आदी कागदपत्रे नेमणुकीपूर्वी देणे हे सुरक्षारक्षक संस्थेवर बंधनकारक असावे व सुरक्षारक्षक ठराविक कालांतराने बदलत राहावे. गृहसंस्थेच्या आवारात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती व वाहनाची नोंद करणे हे सुरक्षारक्षकाचे सर्वांत महत्त्वाचे काम असल्याने वॉचमन कॅबिन व बुम बॅरियर असणे अत्यावश्‍यक आहे. शिवाय संस्थेत सीसीटीव्ही बसवले असल्यास सुरक्षारक्षकाच्या हालचालीही त्यात दिसाव्या. सुरक्षारक्षक पुरवणाऱ्या संस्थेचा मासिक मोबदला हा सर्टिफाइड पेमेंटवर आधारित असावा. वरील पारदर्शक पद्धतीचा काटेकोरपणे वापर केल्यास गृहसंस्थेच्या सुरक्षेवर होणारा खर्च वसूल होतो. पैशांचा अपव्यय टळतो आणि सभासदांना निश्‍चितच सुरक्षित वाटते. गृहसंस्थेच्या वार्षिक एक लाख रुपयांपुढील कोणत्याही खर्च वा करारासाठी वरील कार्यपद्धती अवलंबल्यामुळे सर्वच बाबतीत शिस्तबद्धता व पारदर्शकता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com