Career Opportunities : कॉमर्समध्ये करिअर करायचंय? ‘या’ आहेत सुवर्णसंधी!

Top Career Opportunities After Choosing the Commerce Stream Career Opportunities in Commerce Stream : दहावीनंतर विद्यार्थ्यांसमोर विज्ञान, वाणिज्य आणि कला या तीन प्रमुख शाखांपैकी एक निवडण्याचा टप्पा येतो. यामध्ये वाणिज्य शाखा निवडणाऱ्यांची संख्या इतर शाखांच्या तुलनेत अधिक असते.
Career Opportunities in Commerce Stream
Career Opportunities in Commerce Streamsakal
Updated on

Career Opportunities : दहावीनंतर विद्यार्थ्यांसमोर विज्ञान, वाणिज्य आणि कला या तीन प्रमुख शाखांपैकी एक निवडण्याचा टप्पा येतो. यामध्ये वाणिज्य शाखा निवडणाऱ्यांची संख्या इतर शाखांच्या तुलनेत अधिक असते. वाणिज्य शाखा निवडल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर करिअरचे अनेक विविध पर्याय खुल्या होतात. कोणते आहेत हे पर्याय? चला जाणून घेऊया.

करिअरची निवड हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा महत्त्वाचा टप्पा असतो. अनेकांच्या करिअर निवडीच्या संकल्पना या कौटुंबिक पार्श्‍वभूमीवर ठरलेल्या असतात. बदलत असलेले जीवनमान, वाढत जाणार्‍या गरजा आणि अपेक्षा, स्पर्धेची समस्या अशा अनेक कारणांमुळे करिअर निवडीच्या बाबतीत अनेक भ्रम आणि संभ्रम निर्माण होत जातात. उपलब्ध असलेले अनेक पर्याय, आपल्या संपर्कात येणार्‍या प्रत्येकाच्या अनुभवाच्या, मार्गदर्शनाच्या काही सूचना या सर्वांमुळे विद्यार्थी आणि पालक संभ्रम निर्माण होऊन हतबल होतात.

सध्याच्या शिक्षण पद्धतीनुसार प्रत्येकाला दहावी, बारावी आणि पदविका अथवा पदवी करण्याचे प्रामुख्याने तीन शाखांचे पर्याय उपलब्ध आहेत. विज्ञान, वाणिज्य आणि कला या तीन मूलभूत शाखांपैकी दहावीच्या शिक्षणानंतर एका शाखेची निवड करावी लागत असते. यांपैकी वाणिज्य शाखेची निवड करणार्‍यांची संख्या इतर दोन्ही शाखांच्या तुलनेने खूप मोठी असते. वाणिज्य शाखेची निवड केल्यानंतर करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध असल्याचे अनेकदा अभ्यासपूर्वक समजून घेतलेले नसते.

- करिअर निवडीतील महत्त्वपूर्ण घटक
करिअर निवडीसाठी काही महत्त्वाच्या घटकांचा अभ्यासपूर्ण विचार करणे आवश्यक ठरते. हे घटक आपल्यातील सर्जनशीलतेशी निगडित आहेत. करिअर घडवण्यासाठी पुढील घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत :

- दृष्टिकोन : करिअर निवडीमध्ये आपल्या भावी आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे? यावर आपले पुढील जीवनानुभव ठरणार आहेत.
- सकारात्मकता : आपल्या सकारात्मक विचारांच्या आधारे घेतलेला करिअर निवडीचा निर्णय हमखास यशच देतो. आपली इच्छाशक्ती, उत्साह आणि योग्य दिशा यांना टिकवून ठेवण्यासाठी सकारात्मकता उपयुक्त ठरते.

- नावीन्य : करिअर निवडीला नावीन्याची जोड द्यावी. नवीन शिकत राहिल्याने आपल्या ज्ञानाची अनेक दारे आपल्यासाठी सतत उघडी राहतात. त्यामुळे एकूणच व्यक्तिमत्त्वाचा विकास जलद होत राहतो.

- प्रेरणा : आपल्या सर्जनशील विचारात प्रेरणा देणार्‍या अनेक बाबी असतात. अशा विचारांत नेहमीच नवीन काही निष्पन्न करण्याची क्षमता असते. त्यामुळे करिअरसाठी निश्‍चित अशी एक योग्य दिशा मिळू शकते. म्हणूनच ती प्रेरणादायी ठरते.

- अधिकृतता : निवडलेल्या अभ्यासक्रमाची, शैक्षणिक संस्थेची आणि अर्थार्जनाच्या पर्यायांची अधिकृतता निर्णयापूर्वी तपासणे आवश्यक असते. निवडलेला अभ्यासक्रम नोकरी-व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पूरक आहे का? संबंधित संस्था अधिकृत, नोंदणीकृत, मान्यताप्राप्त आहे का? हे पाहणे अत्यंत जरुरीचे असते.

सद्य:स्थितीत जे शिक्षण आपल्यासाठी त्वरित अर्थार्जनाचे मार्ग खूले करून देईल तेच करिअर निवडले पाहिजे. मग ते अगदी परदेशात जाऊन घ्यावे लागले तरी काय हरकत आहे? तो कदाचित आपल्या विकासाचा पाया ठरू शकतो. त्यासाठी भरघोस यश मिळालेच पाहिजे, हे विसरून चालणार नाही.

निरनिराळ्या देश-विदेशांतील अनेक यशोगाथा तसेच तेथील शिक्षणाविषयीची सविस्तर माहिती अनेक प्रकारे उपलब्ध होत असते. पण, नेमके काय करावे, कोणते करिअर निवडावे? याचाच संभ्रम निर्माण होत असतो.

नावीन्यपूर्ण करिअरची ओढ अनेकांना असते, परंतु अनेकदा संबंधित पुरेशी माहिती एकत्रितपणे मिळत नाही. आपल्याला दीर्घ आणि निरोगी आयुष्य मिळवण्यासाठी योग्य करिअरची निवड करणे अनिवार्य झाले आहे. केवळ योग्य करिअरच आपल्याला पुरेसे अर्थार्जन मिळवून देऊ शकते.

वाणिज्य शाखेतील वैविध्यपूर्ण करिअर पर्याय

वाणिज्य शाखेतील वैविध्यपूर्ण पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा आणि त्यानंतर उपलब्ध होणार्‍या करिअर संधींचा वेध घेणे महत्त्वाचे असते. जगात सर्वत्र आर्थिक घडामोडी मोठ्या प्रमाणावर घडत असतात किंबहुना बहुतेक घडामोडींचे केंद्र हे अर्थकारणच असते. त्यामुळे वाणिज्य क्षेत्राची निवड ही या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

वाणिज्य शाखेत प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना व्यापार, व्यवसाय, बाजारातील चढउतार, अर्थशास्त्राची मूलभूत तत्त्वे, सरकारची वित्तीय धोरणे, औद्योगिक धोरण, शेअर मार्केट आदी बाबींचे ज्ञान प्राप्त होत जाते. बारावीनंतर विद्यार्थी बी. कॉम, त्यानंतर एम.कॉम करू शकतो. या दरम्यान संंधित विद्यार्थ्यांचा वित्त, व्यवसाय, प्रशासन, लेखा, ई-कॉमर्स, विक्री, विपणन, वितरण आदी विषयांचा अभ्यास होत असतो. बारावीनंतर वित्त, विमा, बँकिंग, चार्टर्ड अकाउंटन्सी, परदेशी व्यापार, स्टॉक ब्रोकिंग अ‍ॅण्ड इव्हेन्स्टमेंट अ‍ॅनॅलिस्ट यांसारखे अभ्यासक्रम निवडता येऊ शकतात.

अलीकडच्या काही वर्षांत बॅचलर इन अकाउंटन्सी अ‍ॅण्ड फायनान्स, बॅचलर इन बँकिंग अ‍ॅण्ड इन्शुरन्स, बॅचलर ऑफ फायनान्शियल मार्केट्स असे वैशिष्टयपूर्ण अभ्यासक्रम काही संस्थांनी सुरू केले आहेत. बिझनेस इकॉनॉमिक्स, फायनान्स अ‍ॅण्ड कंट्रोल या विषयातही पदव्युत्तर पदवी प्राप्त करता येऊ शकते.

वाणिज्य शाखेत पदव्युत्तर पदवी घेतलेल्या उमेदवारांना अध्यापन, नागरी सेवा, उच्च शिक्षण, बँकिंग क्षेत्र, ब्रोकिंग, संशोधन, विमा क्षेत्र, वित्तीय संस्था, कॉस्ट अकाउंटन्ट, कंपनी सेक्रेटरी, चार्टर्ड अकाउंटन्ट अशाही अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. बी.कॉम. आणि एमबीए अशा पदव्या प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील कंपन्या, कॉर्पोरेट्स या ठिकाणी उत्तम संधी मिळू शकते.

जो विद्यार्थी संख्याशास्त्रावर प्रभुत्व मिळवू शकतो, त्याला वित्तीय अभियांत्रिकी (फायनान्शिअल इंजिनिअरिंग) या उच्च श्रेणीच्या आणि आव्हानात्मक कार्य क्षेत्रात काम करण्याचीदेखील संधी मिळू शकते. भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देणार्‍या घटकांमध्ये बँक डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट्स, व्हेंचर कॅपिटल, विमा, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट यामध्ये सातत्याने नव्या बाबी घडत आहेत.

त्याचाही लाभ वाणिज्य शाखेतील प्रशिक्षित उमेदवार घेऊ शकतात. जागतिकीकरणानंतर जगभरातील बँका आणि विमा कंपन्यांनी आपले जाळे सर्वत्र पसरवण्यास सुरुवात केल्यामुळे या कंपन्यांना तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज भासत असते.

त्यामुळे वाणिज्य शाखेची पार्श्‍वभूमी असलेल्या उमेदवारांना करिअर घडवण्याचे नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत. एमबीए (फायनान्स) हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना अधिक चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. व्यावसायिक आणि व्यापारी उलाढालीचे उत्तम ज्ञान वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी मिळवले असल्यास त्यांना ई-कॉमर्स क्षेत्रातही चांगली कामगिरी करता येऊ शकते.

जरा हटके करिअर पर्याय

वाणिज्य शाखेत बारावीपर्यंतचे अथवा पदवीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना थोडा हटके विचार करून, काही प्रमाणात स्वतःच्या कल्पकतेला वाव मिळेल, असे करिअर निवडता येऊ शकते. त्यासाठी अनेकविध पर्याय सद्य:स्थितीत उपलब्ध आहेत जसे - फॅशन डिझायनिंग, टेक्सटाईल डिझायनिंग, इंटेरिअर डिझायनिंग, अनिमेशन आणि मल्टिमीडिया, ग्राफिक डिझाइन, वे डिझाइन, अनिमेशन डिझाइन, लॉ आणि ह्यूमॅनिटीज, लॉ, इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी, सोशिऑलॉजी.

हॉस्पिटॅलिटी आणि एव्हीएशन, हॉटेल मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट, ट्रॅव्हल आणि टुरिझम, मीडिया, जर्नालिझम, मास कम्युनिकेशन, मीडिया मॅनेजमेंट, फोटोग्राफी, अभिनय प्रशिक्षण, मॉडेलिंग, एअर होस्टेस, फाइन आर्ट, लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, फॉरेन लँग्वेज, शिक्षक प्रशिक्षण, लॉ कोर्स, रिटेल आणि फॅशन मर्चनडाईझ इत्यादी. विशेषतः या अभ्यासक्रमाच्या यशस्वी पूर्ततेनंतर त्वरित व्यावसायिक संधीदेखील उपलब्ध होत आहेत.

आज खरी गरज आहे योग्य करिअरच्या निवडीची. आवड आणि निवड यांचा करिअरच्या दृष्टिकोनातून खूपच जवळचा संबंध असतो. तरीही केवळ आवड आहे म्हणून करिअरची निवड करणे उपयोगी ठरतेच असे नाही. अनेकदा आवडते करिअर निवडले, तरीही केवळ ते आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपयुक्त ठरतेय का? हेही बघणे जरुरीचे असते. करिअरची निवड करताना आपल्याला मिळणारा आनंद, समाधान आणि स्थैर्य महत्त्वाचे असते.

- प्रा. शैलेश कुलकर्णी(करिअर मार्गदर्शक)

Career Opportunities in Commerce Stream
Maharashtra 12th Result 2025: मुली ठरल्या वरचढ पण बारावीचा निकाल घसरला, एका क्लिकवर जाणून घ्या रिझल्टची संपूर्ण वैशिष्ट्ये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com