
Indian Army Pension : निवृत्तिवेतनासंबंधी नवी पद्धत हाताळताना अनेक अडचणी
पुणे - भारतीय सशस्त्र दलातून निवृत्त झालेले जवान, अधिकारी तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनाशी निगडित सर्व प्रक्रिया ‘स्पर्श’ या पोर्टलच्या माध्यमातून होत आहे.
मात्र, अनेक माजी सैनिकांना या नव्या पद्धतीला हाताळण्यास अडचणी येत असून ‘स्पर्श पेन्शन पेमेंट ऑर्डर’शी (पीपीओ) संबंधित माहिती मिळविण्यास समस्या येत असल्याचे माजी सैनिकांनी सांगितले.
डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत सरकारच्या संरक्षण लेखा विभागाद्वारे विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे देशातील विविध भागांत स्थायिक झालेल्या माजी सैनिकांना निवृत्तिवेतनाशी संबंधित ऑनलाइन सेवा मिळवणे सोपे व्हावे, हा या मागचा उद्देश आहे.
यासाठी निवृत्तिवेतन धारकांचा जुना डेटा ‘स्पर्श’वर स्थलांतर करण्यात येत आहे. मात्र, डिजिटायझेशनच्या या नव्या योजनेमार्फत लाभ घेण्यासाठी असलेली प्रक्रिया अवघड तसेच स्पष्ट माहिती नसल्याने माजी सैनिक, निवृत्त अधिकारी व इतर निवृत्त संरक्षण कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
याबाबत माजी सैनिक जगरूप सिंह यांनी सांगितले की, ‘‘‘स्पर्श’च्या माध्यमातून नक्कीच फायदा होणार आहे, परंतु याची प्रक्रिया क्लिष्ट असल्याने अनेक लाभार्थी या लाभापासून वंचित राहू शकतील. निवृत्तीनंतर बऱ्याच गोष्टींचे मार्गदर्शन थेट मिळत नाही.
निवृत्ती वेतनाचे प्रत्येक महिन्यातील अपडेट तसेच निवृत्ती वेतनात वाढ, महागाई भत्ता अशा वेगवेगळ्या गोष्टींची माहिती सहजपणे मिळणे गरजेचे आहे.’’
काय आहे स्पर्श?
स्पर्श म्हणजेच ‘सिस्टम फॉर पेन्शन ॲडमिनिस्ट्रेशन (संरक्षण)’. संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाशी निगडित विविध बाबी सुलभ करण्यासाठी ‘स्पर्श’ची अंमलबजावणी केली आहे.
त्यामध्ये निवृत्तीवेतनाशी संबंधित माहिती जसे की, निवृत्ती वेतनाची सुरवात, त्यासाठीची मंजुरी, पुनरावृत्ती, वितरण आदींचा समावेश आहे. या प्रणालीमध्ये थेट माजी सैनिकांच्या खात्यात निवृत्तिवेतन जमा करणे समाविष्ट आहे.
माजी सैनिकांसमोरील समस्या
स्पर्श या डिजिटल पोर्टलला हाताळण्यासाठी डिजिटल साक्षरता नाही
प्रत्येक निवृत्तिवेतन धारकांच्या जुन्या निवृत्तीवेतनाचे खाते हे वेगवेगळ्या बँकांमध्ये
काही बँकांद्वारे ‘स्पर्श’साठीची प्रक्रिया जलद, तर काही बँकांमध्ये प्रक्रियेसाठी वेळ लागत आहे
स्पर्शशी संबंधित अडचणी...
- अनेक निवृत्तिवेतन धारकांना लॉगिन-पासवर्ड मिळालेला नाही
- यामुळे वैयक्तिक डेटा पडताळणी प्रक्रिया होत नाही
- परदेशातील निवृत्तिवेतन धारकांना स्पर्शचा ॲक्सेस नाही
- आधारकार्ड पडताळणी प्रक्रिया होत नाही
बहुतांश माजी सैनिकांचे रेकॉर्डमध्ये असलेले नाव आणि आधारकार्डवर असलेले नाव वेगवेगळे असल्याने आधारकार्ड आणि रेकॉर्ड डेटा ‘मिसमॅच’ होत असल्याचे सांगितले जाते. यामुळे लॉगिन आयडी, पासवर्ड उपलब्ध होण्यास अडथळा येत आहे.
- कमांडर रवींद्र पाठक (निवृत्त)
याची मागणी -
- स्पर्शवर आधारकार्ड थेट लिंक करावे
- मार्गदर्शक तत्त्वे सोपे आणि प्रत्येकाला समजेल असे असावे
- समस्या सोडविण्यासाठी मदत सेल तयार करणे
- तांत्रिक अडचणी वेळेत सोडविण्याचा प्रयत्न करणे
संभ्रमात पाडणारा संदेश
माजी सैनिकांना ‘स्पर्श’द्वारे एक संदेश प्राप्त झाला होता. हा संदेश मिळाल्यावर २४ तासांनंतर स्पर्शवर लॉगइन करत माजी सैनिकांनी मूळ ‘पेन्शन पेमेंट ऑर्डर’च्या (पीपीओ) ऐवजी ‘पेन्शनर १०’ आणि कॉम पीपीओ तयार करण्यास सांगितले होते.
दरम्यान, निवृत्तिवेतन धारकांना कोणतीही लॉगिन माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हे प्रकरण संरक्षण लेखा कार्यालय (पीसीडीए-पी) अलाहाबाद येथील स्पर्श पथकाकडे पाठविले.
स्पर्श टीम त्याची तपासणी करत असून माजी सैनिकांच्या निवृत्तिवेतनावर याचा परिणाम होणार नसल्याचेही पीसीडीए (पी), अलाहाबादने स्पष्ट केले.