पुण्यात २५६ दिवसांनंतर एकही मृत्यू नाही

शहराने कोरोनाच्या दोन लाटांचा महाभयंकर उद्रेक अनुभवला. मार्चमध्ये सुरू झालेली कोरोनाची पहिली लाट जानेवारीपर्यंत होती.
Corona Vaccination
Corona Vaccinationsakal media

पुणे - पुणे शहरात २५६ दिवसांनंतर कोरोनाच्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. स्वतःचा जीव धोक्यात घालून पुण्यातील वैद्यकीय तज्ज्ञांनी अत्यवस्थ कोरोनाबाधितांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणले. त्यामुळे महापालिकेच्या दफ्तरी बुधवारी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

शहराने कोरोनाच्या दोन लाटांचा महाभयंकर उद्रेक अनुभवला. मार्चमध्ये सुरू झालेली कोरोनाची पहिली लाट जानेवारीपर्यंत होती. शहरात २५ जानेवारीला सर्वांत कमी म्हणजे ९८ पर्यंत रुग्णसंख्या कमी झाली होती. ही पहिल्या लाटेतील नीचांकी रुग्णसंख्या होती. पुण्यात ६ फेब्रुवारी रोजी सर्वप्रथम कोरोनाचे शून्य मृत्यू नोंदले गेले. तोपर्यंत कोरोनाने चार हजार ९४५ रुग्ण मृत्यूमुखी पडले होते. मार्चनंतर कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. पहिल्यापेक्षा दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलीच, पण मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे आकडेही बेसुमार वेगाने वाढत होते. देशातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात होते. शहरात ८ एप्रिल या एका दिवशी सात हजार १० रुग्ण आढळले होते. ही शहरातील दुसऱ्या लाटेतील एका दिवसातील उच्चांकी रुग्णसंख्या ठरली. त्याच दरम्यान २ मे रोजी शहरात एकाच दिवशी ९३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. त्यापैकी ६६ रुग्ण शहरातील होते. तर, २७ रुग्ण उपचारांसाठी पुण्यातील रुग्णालयांमध्ये दाखल झाले असल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.

पुण्यातील डॉक्टरांना श्रेय

शहरात आता ६ फेब्रुवारीनंतर तब्बल २५६ दिवसांनी कोरोनाच्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, असा दिवस मावळला. याचे सर्व श्रेय पुण्यातील डॉक्टरांना जाते. कोरोनाचा प्रत्येक जीव वाचविण्यासाठी असंख्य वेळा डॉक्टरांनी, परिचारिकांनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांचा जीव धोक्यात घातला. पुण्यातील कुशल डॉक्टर, प्रशिक्षित परिचारिका आणि अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज रुग्णालये यामुळे पुण्यात उपचारांसाठी येणाऱ्या कोरोनाबाधितांचे प्रमाण सातत्याने वाढत होते. याचा ताण येथील वैद्यकीय सेवेवर पडत होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी ही रुग्णसेवा केली.

Corona Vaccination
कुशल आयटीयन्स टिकवण्यासाठी पुन्हा रिटेनशल बोनस देण्यास सुरवात

यामुळे झाले शून्य मृत्यू

  • पुण्यात कोरोनासाठी निर्माण झालेली ‘सामूहिक प्रतिकार शक्ती’ (हर्ड इम्युनिटी)

  • लसीकरणाला पुणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद

  • मास्क, वारंवार हात स्वच्छ धुणे आणि सामाजिक अंतर या नियमांचे काटेकोर पालन

शहरात लसीकरणाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच, लस घेऊनही कोरोना झाला तरीही त्यातील गुंतागुंत कमी होते. रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागत नाही. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही कमी झाले. लसीकरण आणि ‘हर्ड इम्युनिटी’ याचा एकत्रित परिणाम म्हणजे कोरोनाचा एकही मृत्यू आज झाला नाही.

- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका

पुणे महापालिकेने उभी केलेली आरोग्य यंत्रणा, व्यापक पातळीवर केलेले लसीकरण आणि सण-उत्सवाच्या काळात पुणेकरांनी दिलेली साथ यामुळे शहरातील कोरोना संसर्गस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. मृत्यूसंख्या शून्यावर येणे हा मोठा दिलासा असून, ते पुणेकरांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश आहे.

- मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com