
खडकवासला परिसरात आजही वाहतूक कोंडी नाही
किरकटवाडी - संततधार पाऊस आणि आषाढी एकादशी व बकरी ईद या सणांमुळे खडकवासला आणि सिंहगड परिसरात मागील रविवारच्या तुलनेत पर्यटकांची संख्या कमी प्रमाणात दिसून आली. खडकवासला धरण चौपाटी व धरण चौकात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून हवेली पोलीसांनी व सिंहगड घाट रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वन विभागाने काटेकोर नियोजन केल्याने किरकोळ वाहतूक कोंडी वगळता दोन्ही ठिकाणी वाहतूक सुरळीत सुरू होती.
वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार सिंहगडावर जाज 548 चारचाकी व 2207 दुचाकी वाहनांनी सुमारे सहा ते सात हजार पर्यटकांनी भेट दिली. यातून 1 लाख 65 हजार 150 रुपये महसूल दिवसभरात जमा झाला. मागील रविवारच्या तुलनेत ही संख्या कमी असल्याचे वन परिमंडळ अधिकारी बाबासाहेब लटके यांनी सांगितले. परिणामी सिंहगडावर नेहमीसारखी वाहतूक कोंडीची समस्याही जाणवली नाही.
खडकवासला धरण चौपाटी व धरण चौकात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मागील रविवारपासून हवेली पोलीसांनी नियोजन केलेले आहे. या रविवारी होमगार्ड जवानही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तैनात असल्याने वाहतूक सुरळीत असल्याचे दिसून आले. वाहनांची गर्दी होती परंतु दिवसभरात खडकवासला परिसरात वाहतूक कोंडीचा प्रसंग उद्भवला नसल्याचे हवेली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे यांच्याकडून सांगण्यात आले.
"मागील रविवारच्या तुलनेत या रविवारी सिंहगडावर आलेल्या पर्यटक व दुर्गप्रेमींची संख्या कमी होती. पावसाचे प्रमाण वाढल्याने पायी गडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्याही कमी झाली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वन समिती व वन विभागाकडून नियोजन करण्यात आले होते."
- बाबासाहेब लटके, खानापूर वन परिमंडळ अधिकारी.
"दिवसभरात वाहतूक कोंडी निर्माण झाली नाही. खडकवासला चौपाटी परिसरात पर्यटकांची गर्दी दिसत होती परंतु त्याचा वाहतूकीवर परिणाम झाला नाही. आज वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर होमगार्ड जवानही तैनात होते."
- निरंजन रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.
Web Title: There Is No Traffic Jam In Khadakwasla Area
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..