विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्यास जबाबदार कोण? शाळा सुरू करण्यावरून उमटल्या संमिश्र प्रतिक्रिया

School-Coronavirus
School-Coronavirus

पुणे : ऑनलाइन शिक्षण असले, तरी शेवटच्या घटकातील विद्यार्थ्यांपर्यंत हे शिक्षण पोचलेले नाही. त्याशिवाय ऑनलाइन वर्गात मुलांना शिकणे अवघड जाते. त्यामुळे शाळा सुरू होणे आवश्यक आहे, असे काही पालकांचे म्हणणे आहे. तर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. अशात विद्यार्थ्यांना शाळेत बोलाविणे योग्य ठरणार नाही. शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा, असे काहींचे म्हणणे आहे. एकूणच राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत नागरिकांमध्ये संमिश्र भावना असल्याचे निदर्शनास येते.

कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. 'शिक्षकांनी मुलांचे शिक्षण चांगले ठेवण्यासाठी पूर्वापेक्षा अधिक मेहनत घेतली आहे. शेवटच्या घटकातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे; यासाठी काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. दरम्यान, सर्व शाळा संस्थाचालक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी पुढे येऊन शाळा सुरू करण्याबाबतच्या आपल्या सूचना द्याव्यात, असे आवाहन गायकवाड यांनी फेसबुक, ट्विटर याद्वारे केले आहे.

शिक्षण मंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी आपली मते मांडली आहेत. ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा लक्षात घेता, प्रत्यक्षात शाळा सुरू करण्याचा निर्णय योग्य आहे. परंतु कोरोनाच्या संसर्गाची दूसरी लाट येण्याची शक्यता असताना, मुलांचे आरोग्य धोक्यात टाकणे कितपत योग्य ठरेल, याचा विचार व्हायला हवा, अशा स्वरूपाचे मत अनेकांनी व्यक्त केल्याचे दिसून येत आहे.

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शाळा सुरू करण्याला होकार दर्शविणाऱ्या नागरिकांची मते :-

"शिक्षणाप्रती मुलांची मानसिकता बदलत आहे. आणखी काही दिवस शाळा बंद राहिल्या तर मुलांना शिक्षण नकोसे  वाटू लागेल. ऑनलाईन शिक्षण खुप कमी विद्यार्थ्यांपर्यंत पोचत आहे. वेळीच योग्य खबरदारी घेऊन शाळा सुरु नाही केल्यास विशेषत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खूप किंमत मोजावी लागेल. शहरी भागात ऑनलाईन शिक्षणासाठी सोयी उपलब्ध आहेत. पण ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणात असंख्य अडचणी येत आहेत. त्यामुळे शाळा लवकर चालू करणे गरजेचे आहे."
- तुषार भोसले 

"प्रायोगिक तत्वावर दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु करावेत. सद्यस्थितीत कोरोना जरी आटोक्यात आला असला तरी तो संपला नाही. तसेच खरंच सर्व शाळा महाविद्यालयाकडे पूर्वदक्षता म्हणून सर्व तयारी आहे का? हे पाहणेही महत्त्वाचे आहे. बऱ्याच विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना पगार द्याला, पैसे नाहीत. तसेच अनुदानित शाळा नुसत्या नावाला अनुदानित राहिल्या आहेत. त्यामुळे सध्या केवळ दहावी-बारावीचे वर्ग सुरु करावेत."
- शंकर सुतार 

"शाळा, महाविद्यालये सुरू करणे खूप गरजेचे आहे. कारण सध्या ऑनलाईन पद्धतीने शिकवलेले सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचत नाही आणि शिकविलेले विद्यार्थ्यांना कळतेच असे नाही. शाळा सुरू करण्याचा निर्णय योग्य आहे. फक्त विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे."
- राहुल ठाकुर 

- जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शाळा सुरू करण्याचा निर्णयाशी समंत नसलेले नागरिक :

"कोरोनावर लस आल्याशिवाय शाळा सुरु करणे धोकादायक आहे. आरोग्य यंत्रणेचा सल्ला घेऊन  निर्णय  घ्यावा. आगामी काळात कोरोना शाळेतील विद्यार्थ्यांना झाला तर फार  मोठा धोका निर्माण होईल. याची  जबाबदारी कोणाची?"
- विजय मेटे 

"कोरोनावर खात्रीदायक लस आल्याशिवाय शाळा सुरु करण्यात येऊ नयेत. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य जपण्याला राज्य सरकारने प्राधान्य द्यायला हवे."
- प्रसाद जोशी 

"कोरोनाची दूसरी लाट येण्याची शक्यता असताना हा निर्णय घेणे योग्य नाही. तसेच काही शाळांची विद्यार्थी संख्या विचारात घेता एक पालक म्हणून ही बाब विचार करण्यासारखी आहे. काही ठिकाणी एका वर्गात ८० किंवा त्याहुन अधिक विद्यार्थी संख्या आहे. दिवसाआड शाळा म्हटले तरी एकावेळी ३५ ते ४० विद्यार्थी असतील. या विद्यार्थ्यांचे शारीरिक अंतर राखणे अशा ठिकाणी अवघड होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांचा विचार करून निर्णय घेणे अपेक्षित आहे."
- प्रवीण शेळके 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com