esakal | बारामतीतील परप्रांतीय कामगारांचे झाले नाही स्थलांतर; कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीतील परप्रांतीय कामगारांचे झाले नाही स्थलांतर; कारण...

परप्रांतीय कामगारांनी मोठ्या प्रमाणात आपल्या गावाकडे कुटुंबासमवेत स्थलांतर केल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहावयास मिळाले. मात्र, याला बारामतीतील "व्हेरीटास इंजिनिअरिंग कंपनी" अपवाद ठरली आहे. 

बारामतीतील परप्रांतीय कामगारांचे झाले नाही स्थलांतर; कारण...

sakal_logo
By
विजय मोरे

उंडवडी : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन झाल्यानंतर मुंबई, पुणे सारख्या शहरातील कंपन्या व कारखान्यातील परप्रांतीय कामगारांनी मोठ्या प्रमाणात आपल्या गावाकडे कुटुंबासमवेत स्थलांतर केल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहावयास मिळाले. मात्र, याला बारामतीतील "व्हेरीटास इंजिनिअरिंग कंपनी" अपवाद ठरली आहे. 

बारामती एमआयडीसीतील "व्हेरिटास इंजिनिअरिंग ॲन्ड इरेक्टर्स" या कंपनीत काम करणाऱ्या तब्बल दोनशे परप्रांतीय कामगारांची कंपनी व्यवस्थापनाने अन्न , धान्यसह किराणा माल देवून सेवा पुरविली आहे. त्यामुळे या कामगारांची लॉकडाऊनच्या काळातील भटंकतीसह, उपासमार व स्थलांतर थांबण्यास मदत झाली आहे.

बारातमीतील 'व्हेरिटास इंजिनिअरिंग ॲन्ड इरेक्टर्स" कंपनीत मोठमोठ्या इंडस्ट्रीज, कारखाने उभारण्यासाठी लागणारे मोठमोठे लोखंडी खांब व वेगवेगळे साचे तयार करण्यात येतात. हे काम करण्यासाठी या कंपनीत उत्तर प्रदेश व बिहार या राज्यातील जवळपास दोनशे कामगार आहेत. ते एमआयडीसी परिसरात आपल्या कुटुंबासमवेत राहत आहेत. मात्र, देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यानंतर कंपनीही बंद करण्यात आली.

लॉकडाऊनच्या काळात कामगारांची उपासमार, गैरसोय व कामगार आपल्या गावाकडे जावू नयेत. यासाठी 'व्हेरीटास कंपनी' चे सर्वेसर्वा दिलीप भापकर यांनी कामगारांना दैनंदिन लागणारा किराणा माल, अन्नधान्य घरपोच दिले आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात या कंपनीतील कामगारांची भटंकती व स्थलांतर थांबले आहे. तसेच कोरोना सारख्या संसर्गजन्य आजाराचा फैलाव रोखण्यासाठीही मोठी मदत झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतर कामगारांचा तुटवडा निर्माण होणार नाही.

दिलीप भापकर म्हणाले, 'आमच्या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचे हातावर पोट आहे. बंदच्या काळात कामगारांची गैरसोय किंवा भटंकती होवू नये, यासाठी सर्वच कामागाराना आमच्या कंपनीकडून त्याना लागणारा किराणा माल घरपोच करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व कामगार आपल्या कुटूंबासमेवत घरातच आहेत. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतर कंपनीचे काम पूर्ववत करणे सहज शक्य होणार आहे'.

loading image