आताच्या राज्यकर्त्यांना 'व्हिजन' नाही - पृथ्वीराज चव्हाण

संतोष शेंडकर
सोमवार, 25 जून 2018

सध्याच्या नेतृत्वाला, राज्यकर्त्यांना 'व्हिजन' नाही. केवळ पन्नास कोटीत विश्वविद्यालय करता येत नाही हे त्यांना समजत नाही, असे गंभीर विवेचन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. 
 

सोमेश्वरनगर - जगात व्यापरयुध्द सुरू आहे आणि जगापुढे कृत्रीम बुध्दमत्तेचा धोका आहे. ड्रोन, रोबोट, विनावाहक गाड्या, महासंगणक याचे युग आहे. किती नोकऱ्या जातील आणि नवीन किती होतील याबाबत जगभर चिंता आहे. असे संशोधनही भारतात होत नाही. जागतिक दर्जाची गुणवत्ता निर्माण झाली पाहिजे. वैज्ञानिक दृष्टीकोन असल्याशिवाय भारत महासत्ता बनू शकत नाही. परंतु सध्याच्या नेतृत्वाला, राज्यकर्त्यांना 'व्हिजन' नाही. केवळ पन्नास कोटीत विश्वविद्यालय करता येत नाही हे त्यांना समजत नाही, असे गंभीर विवेचन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. 

येथील मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व कै. बाबालाल काकडे यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण पृथ्वीराज चव्हाण, खासदार राजू शेट्टी व माजी सहकारमंत्री हर्षवधर्न पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी झालेल्या सभेत चव्हाण बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार संभाजीराव काकडे होते. याप्रसंगी माजी आमदार विजयराव मोरे, शामकाका काकडे, शिवाजीराव भोसले, 'माळेगाव'चे अध्यक्ष रंजन तावरे, पृथ्वीराज जाचक, शहाजी काकडे, सतीश खोमणे, प्रमोद काकडे, दत्ताजी चव्हाण, जयवंतराव घोरपडे आदी उपस्थित होते. 

चव्हाण म्हणाले, स्वातंत्र्यापूर्वी वर्णव्यवस्था असल्याने बहुतेक लोकांना ज्ञानापासून वंचित ठेवलं आणि मूठभर इंग्रजांनी भारत पादाक्रांत केला. मागील पन्नास वर्षात शाहू, फुले, आंबेडकर आदींच्या विचारांनी परिवर्तन झाले. नेहरूंनी वैज्ञानिक दृष्टीकोनाचा आग्रह धरला. 76 व्या घटनादुरूस्तीमध्ये 51 ए-एच मध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन व मानवता वृध्दींगत करणे हे नागरिकाचे कर्तव्य आहे असे नमूद केले. वैज्ञानिक दृष्टीकोन असल्याशिवाय भारत  महासत्ता बनू शकत नाही. शिक्षणातून तो मिळाला पाहिजे. परंतु उच्चशिक्षणाच्या गुणवत्तेत आपण मागे आहोत. जगातल्या पहिल्या दोनशे विद्यापीठात भारताचे एकही विद्यापीठ नाही. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय एक हजार कोटीत वीस विश्वविद्यालय बनवायला निघाले आहेत. परदेशात एका विश्वविद्यालयात नुसत्या संशोधनावर नऊ हजार कोटींची तरतूद होते. 

सरकारवर प्रहार करताना चव्हाण यांनी, कर्जमाफीसाठी अर्ज कशाला मागविले? गुजराथ-कर्नाटकात दूधउत्पादकांना अनुदान देतात, शाळांत दूधभुकटी देतात मग इथे का करत नाही? 2022 पर्यंत शेतीउत्पन्न दुप्पट कसे करणार? दोन कोटो रोजगार देणार होता त्याचे काय झाले? असे सवाल उपस्थित केले. तसेच, केंद्रीय गृहमंत्री परदेशात असताना काश्मीर आघाडी तोडली जाते. अर्थमंत्र्यांना माहित नसताना नोटाबंदीचा निर्णय होतो. अशा प्रकारे लोकशाही संस्था मोडीत काढत आहेत. लोक यांना कंटाळले आहेत. आधी लोक आम्हाला 'आता वीस वर्ष विसरा' असं म्हणायचे. आम्हालाही खरं वाटायचं. पण हे सरकार अपयशी ठरले असून 2019 मध्ये निश्चित आम्ही आहोत, असा विश्वास व्यक्त केला. तसेच काकडे महाविद्यालयाला दहा लाख रूपयांची मदत मिळवून देणार असल्याचेही जाहीर केले. शेट्टी यांनी, चव्हाण फार काळ 'माजी' राहणार नाहीत. शेतकरी व कारखानदार एकत्र आले तर आताच्या सरकारची थडगी बांधल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला. 

माजी खासदार संभाजीराव काकडे यांनी, केवळ पुस्तकी शिक्षण देऊन थांबू नका आणि घड्याळाच्या काट्याकडे बघून शिकवू नका असा सल्ला प्राध्यापकांना दिला. महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश काकडे यांनीही मनोगत मांडले. प्राचार्य डॅा. सोमप्रसाद केंजळे यांनी प्रास्ताविक केले. डॅा. जया कदम व प्रा. अच्युत शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no vision to todays politician prithviraj chavan criticized