जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही : झेडपीचे सीईओ आयुष प्रसाद यांची ग्वाही

मिलिंद संगई
Monday, 14 September 2020

जादा दर घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा 

बारामती (पुणे) : कोरोना रुग्णांसाठी जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णालयाला कोणत्याही परिस्थितीत एका मिनिटासाठीही ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, याची काळजी स्थानिक प्रशासन डोळ्यात तेल घालून घेत आहे. त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजनअभावी उपचारात अडचण आली, असे होणार नाही. ऑक्सिजनच्या दरात कोणीही वाढ केलेली नसून तशी तक्रार प्राप्त झाल्यास प्रशासन त्यावर कारवाई निश्चित करेल, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 
आयुष प्रसाद यांनी आज बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात सुरु असलेल्या ऑक्सिजन युनिटच्या कामाला भेट देऊन पाहणी केली. त्या प्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते. पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, उपसभापती प्रदीप धापटे, जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती प्रमोद काकडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, सिल्व्हर ज्युबिलीचे डॉ. सदानंद काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विश्वास ओहोळ आदी या वेळी उपस्थित होते. 

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनो, अशाप्रकारे घ्या काळजी​

आयुष प्रसाद म्हणाले की, माझे कुटुंब माझे आरोग्य या योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासनाने काम सुरु केले आहे. आज बारामती तालुक्यातील माळेगाव, गुनवडी व पणदरे या तीन गावात सर्वेक्षण सुरु असून, बुधवारपासून बारामती शहरात ही मोहीम सुरु होणार आहे. 
 

 

सध्या उपलब्ध असलेल्या एकूण ऑक्सिजनपैकी 95 टक्के ऑक्सिजन पुणे जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रासाठी मिळत असून, उर्वरित पाच टक्के ऑक्सिजन औषध निर्मिती व पूरक व्यवसायांसाठी जात आहे. ऑक्सिजनची कमतरता भासू नये, या साठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. 
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There will be no shortage of oxygen in Baramati