स्वारगेट चौकात पादचाऱ्यांसाठी होणार दोन भुयारी मार्ग

स्वारगेट - पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी दोन भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहेत. त्यांचे काम सध्या सुरू आहे.
स्वारगेट - पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी दोन भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहेत. त्यांचे काम सध्या सुरू आहे.

पुणे - वाहतुकीची वर्दळ असलेल्या स्वारगेट चौकात आता मेट्रोच्या भूमिगत स्थानकाचे काम सुरू असतानाच पादचाऱ्यांसाठी दोन भुयारी मार्गांचे काम नुकतेच सुरू झाले आहे. त्यामुळे चौकातील पादचाऱ्यांची वर्दळ कमी होणार असून, त्यांना थेट पीएमपी आणि एसटी स्थानकात प्रवेश करता येईल. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी दोन्ही मार्ग उपयुक्त ठरतील, असे महामेट्रोचे म्हणणे आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पादचाऱ्यांची सर्वाधिक वर्दळ असलेल्या चौकांमध्ये स्वारगेटच्या जेधे चौकाचा समावेश आहे. पीएमपी व एसटी स्थानक आणि रिक्षा थांबे चौकांमध्येच आहेत. यालगतच खासगी बसही उभ्या असतात. त्यामुळे पादचाऱ्यांची अहोरात्र वर्दळ असते. या चौकातच आता मेट्रोचे मल्टिमोड्यूल ट्रान्स्पोर्ट हब साकारणार आहे. त्यामध्येच जमिनीखाली सुमारे २८ मीटरवर पिंपरी चिंचवड- स्वारगेट मार्गावरील मेट्रोचे भूमिगत स्थानक असेल. यातून भविष्यात कात्रज आणि हडपसरच्या दिशेने मेट्रो जाणार आहे. त्यासाठीही हबमध्येच भविष्यातील मार्गांसाठी रचना केली आहे. भूमिगत स्थानकाचाच एक भाग म्हणून दोन पादचारी मार्ग तयार करण्यात येत आहे. त्यासाठीची खोदाई स्वारगेट एसटी स्थानक आणि गणेश कला क्रीडा केंद्रातून सुरू झाली आहे. सुमारे एक वर्षांत हे पादचारी मार्ग पादचाऱ्यांसाठी खुले होणार आहेत. 

या मार्गांमुळे शंकरशेठ रस्ता, एसटी स्थानकातील प्रवाशांना थेट सारसबागेच्या दिशेने जाता येऊ शकेल तर, पीएमपीतून उतरणाऱ्या प्रवाशांना मेट्रो व एसटी स्थानकातही जाता येणार आहे.

असे असतील मार्ग 
1) स्वारगेट एसटी स्थानकाचे आरक्षण केंद्र ते मल्टिमोड्यूल ट्रान्स्पोर्ट हब ः लांबी १२५ मीटर, रुंदी ७.५ मीटर, उंची ४.५ मीटर 
टिळक रस्ता, सारसबाग, शिवाजी रस्त्यावरून येणाऱ्या पादचाऱ्यांसाठी 
खर्च - १.५ कोटी 

2) गणेश कला क्रीडा मंच ते मल्टिमोड्यूल ट्रान्स्पोर्ट हब ः लांबी १९० मीटर, रुंदी ४.५ मीटर, उंची ३ मीटर
शंकरशेठ रस्ता, एसटी स्थानकातून येणाऱ्या पादचाऱ्यांसाठी  
खर्च - २.५ कोटी 

या असतील सुविधा
सरकते जिने, एलईडी दिवे, पंखे आणि वातानुकूलन यंत्रणा, आपत्कालीन अग्निशमन यंत्रणा. 

३० ते ४० हजार
जेधे चौकात गर्दीच्या वेळेत पादचाऱ्यांची ये-जा

सुमारे १० हजार
गर्दीच्या वेळेत एका तासातील वाहनांची वाहतूक

स्वारगेटचा मल्टिमोड्यूल ट्रान्स्पोर्ट हब हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यातील पादचाऱ्यांसाठीचे दोन भुयारी मार्ग सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. दीड महिन्यापूर्वी त्यांचे काम सुरू झाले असून, एक वर्षात ते पूर्ण होतील.
- हेमंत सोनवणे, महाव्यवस्थापक, महामेट्रो

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com