esakal | थेऊर - कोलवडी रस्त्याचे काम निकृष्टच; लाखोंचा खर्च गेला कुठे ?
sakal

बोलून बातमी शोधा

road

थेऊर - कोलवडी रस्त्याचे काम निकृष्टच; लाखोंचा खर्च गेला कुठे ?

sakal_logo
By
जनार्दन दांडगे.

लोणी काळभोर : पूर्व हवेलीतील थेऊर - कोलवडी या पावणेदोन किलोमीटर लांबीचा डांबरी रस्ता एक महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला होता. पण या दीड किलोमीटर रस्त्याचा भाग कचून रस्त्याला तडे पडले आहेत. त्यामुळे ठेकेदाराच्या कामाविषयी गावकऱ्यांसह पूर्व हवेलीत संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा: टाटाने बोली जिंकली, ५३ वर्षानंतर एअर इंडियाची घरवापसी

शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्याकडे रस्त्याची कामाची मागणी गावकऱ्यांनी केली होती. त्यानुसार आमदार पवार यांनी रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. रस्त्याचे काम सुरू होते त्यावेळी हलक्‍या प्रतीची खडी व अपुऱ्या प्रमाणात डांबर वापरल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. पण सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला समज देण्याऐवजी संरक्षण देण्याचे काम केले आहे, असा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. ठेकेदाराने रस्त्याचे काम पूर्ववत करावे. या रस्त्याच्या कामावर देखरेख ठेवणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्यातील शाखा अभियंता यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही स्थानिक नागरिक करीत आहेत.

दरम्यान, थेऊर फाटा ते लोणीकंद रस्ता रुंदीकरणाचे काम संथ गतीने चालू आहे. पुणे सोलापूर रोड ते पुणे नगर रोडला जोडणारा हा रस्ता आहे. या रस्त्याने दररोज अनेक अवजड वाहने थेऊर, कोलवडी, केसनंद, लोणीकंद या मार्गाहून अनेक वाहने जात आहेत. थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याचे वॉल कंपाऊंड लगत रस्ता गेल्याने एका ठिकाणी वॉल कंपाऊंडची भिंत कोसळली आहे. शेजारून जाणारा रस्ता हा खचला आहे, त्यामुळे लोणी काळभोर वाहतूक पोलिसांच्या शाखेने बॅरीगेट लावून वाहतूक सुरळीत केली.

हेही वाचा: 'महाराजा' पुन्हा टाटांच्या सेवेत, विमानसेवेचा ८९ वर्षांचा प्रवास!

थेऊर फाटा ते थेऊर गाव या रस्त्यासाठी आमदार, खासदार, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे महानगर प्राधिकरण (पीएमआरडी) यांना ग्रामपंचायतीतर्फे निवेदन देण्यात आले आहेत. मात्र, हे सर्वजन या रस्त्याकडे काणाडोळा करीत आहेत. सरकारने यात लक्ष घालून लवकर कायदेशीर मार्ग काढावा. नाहीतर ग्रामपंचायत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. तसेच ग्रामपंचायतीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.

-शीतल काकडे, सरपंच, थेऊर, (ता. हवेली)

सध्या या कामावर कोर्टाकडून स्टे देण्यात आला आहे. येथील शेतकऱ्यांनी थेऊर फाटा ते लोणीकंद रस्ता रुंदीकरणाला विरोध दर्शविला आहे. भूसंपादन करण्याची त्यांची मागणी आहे. हा वाद कोर्टात पोहोचला आहे. या प्रकरणात कोर्टाकडून पीएमआरडीने हस्तक्षेप केला आहे. मात्र, शेतकऱ्यांकडून काम सुरू करण्यास कोणताही प्रतिसाद नाही. रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवायचे आहेत मात्र त्यालाही शेतकरी विरोध करत आहेत.

-मिलिंद बारभाई, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे

loading image
go to top