जागृत शेतकऱ्यामुळे कांदा चोराला पकडण्यात यश

रवींद्र पाटे
Thursday, 22 October 2020

मांजरवाडी (ता. जुन्नर) येथील देवाची जाळी शिवारात आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास चाळीतील कांदा चोरीचा दोन चोरांचा प्रयत्न जागृत शेतकऱ्यामुळे फसला. 

नारायणगाव : मांजरवाडी (ता. जुन्नर) येथील देवाची जाळी शिवारात आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास चाळीतील कांदा चोरीचा दोन चोरांचा प्रयत्न जागृत शेतकऱ्यामुळे फसला. या पैकी एक जणाला शेतकऱ्यांनी पकडून नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले असून, दुसरा पसार झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या प्रकरणी संजय गेनभाऊ पारधी याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याचा सहकारी पोपट काळे हा पसार झाला आहे. अशी माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक डी. के. गुंड यांनी दिली.

देवजाळी येथील नाथा कोंडाजी थोरात व अनिल चक्कर पाटील या शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास आरोपी पारधी व काळे हे दुचाकी व मालवाहतूक रिक्षा घेऊन देवजाळी येथे कांदा चोरीसाठी आले होते. चाळीतील कांदा गोणीत भरून मालवाहतूक रिक्षात भरत होते.

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरम्यान, शेतकरी दिलीप थोरात यांना जाग आली. दिलीप थोरात यांनी आरडाओरडा केल्याने इतर शेतकरी जागे झाले. दरम्यान काळे हा मालवाहतूक रिक्षा घेऊन पसार झाला. जाधव याला शेतकऱ्यांनी दुचाकीसह पकडले. त्या नंतर त्याला दुचाकीसह नारायणगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. जाधव याने चोरी करण्यासाठी वापरलेली दुचाकीसुध्दा चोरीची असल्याचे आढळून आले.

मागील महिन्यात मांजरवाडी लगत असलेल्या खोडद येथील शिवाजी खरमाळे व हिवरे तर्फे नारायणगाव येथील बबन भोर या दोन शेतकऱ्यांच्या चाळीतील ६७ हजार रुपये किंमतीच्या सुमारे दीड टन कांद्यावर चोरट्यांनी डल्ला मारला होता. त्या नंतर आज झालेली कांदा चोरीची ही तिसरी घटना आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कांद्याचा बाजारभावात मोठी वाढ झाल्याने चोरट्यांनी आता कांदा चाळीकडे आपला मोर्चा वळवला आहे. नैसर्गिक समस्यांचा सामना करत शेतकऱ्यांनी अतिशय मेहनतीने मागील सात महिने चाळीतील कांद्याची निगा राखली आहे.आता भाव वाढल्याने शेतकरी कांदा विक्रीच्या तयारीत असताना चोरट्यांनी आता कांदा चाळीना लक्ष केले आहे.नैसर्गिक समस्यां बरोबरच आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रात्रीचा पाहरा ठेऊन मानव निर्मित समस्यांचा सामना करावा लागत आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The thief who came to steal the onion was caught by the farmers