Pune : पोलिसांच्या हातावर चोरट्यांची तुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

पोलिसांच्या हातावर चोरट्यांची तुरी

पुणे : मुंढवा येथे राहणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्याचा ऐन दिवाळीत चोरट्यांनी बंगला फोडला. त्यात चोरट्यांनी तब्बल ४३ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेला पंधरा दिवस उलटूनही पोलिसांना चोरटे अद्याप सापडलेले नाहीत. हा प्रकार एका ‘आयपीएस’ अधिकाऱ्यासोबत असेल, तर सर्वसामान्यांच्या घरी घडणाऱ्या चोरीच्या घटनांचे काय? याच पद्धतीने चोरी, घरफोडी, दरोड्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊनही पोलिसांना चोरट्यांचा बंदोबस्त करता आलेला नाही. विशेषतः अशा गुन्ह्यांकडे पोलिसच गांभीर्याने पाहत नसल्याने चोरट्यांना अक्षरशः मोकळे रान मिळाल्याची सद्यःस्थिती शहरात आहे.

दरवर्षी मे महिना, दिवाळी, नाताळ, नववर्षासह विविध सणसमारंभांनिमित्त मिळणाऱ्या सुट्यांचे औचित्य साधून नागरिक आपापल्या गावी जातात. नेमक्‍या याच कालावधीत शहरात चोरी, घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहराच्या वेगवेगळ्या भागात चोरीच्या घटना घडल्या. याच पद्धतीने दररोज चोरी, घरफोडीच्या घटना घडत आहेत. नागरिकांकडून याबाबत पोलिसांना तत्काळ खबर दिली जाते. त्याचबरोबर पोलिसही घटनास्थळाची पाहणी करून गुन्हे दाखल करतात. परंतु गुन्हे दाखल केल्यानंतरही पोलिसांकडून घटनांचा तपास केला जात नाही.

मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी चोरी, घरफोडी, वाहनचोरी, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, इतर जबरी चोरीच्या घटनींमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. त्याबाबत संबंधित नागरिकांकडून पोलिसांकडे सातत्याने पाठपुरावा केला जातो. तरीही त्या गुन्हेगारांचा शोध घेण्याकडे पोलिसांचे फारसे लक्ष नसल्याचे दिसून येते, तर कधीतरी सापडलेल्या एक-दोन गुन्हेगारांनाच वेगवेगळ्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या गुन्ह्यांची माहिती दिली जाते. त्यापलीकडे पोलिसांचा तपास जात नाही. त्यामुळे काबाडकष्ट करून जमविलेले धन चोरट्यांनी नेल्यानंतरही पोलिस तपास करत नसल्याने अखेर नागरिक कंटाळून पोलिसांकडे जाणेच बंद करत असल्याची सद्यःस्थिती आहे.

गुन्हे शाखेची कारवाई थंडावली

गुन्हे शाखेच्या पथकांकडून मागील वर्षीपर्यंत सातत्याने चोरी, घरफोडी, वाहनचोरीच्या गुन्ह्यातील टोळ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात होती. आता मात्र गुन्हे शाखेची कारवाई थंडावली आहे. त्याचा फायदा चोरटे, गुन्हेगार घेत असून, सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याची सद्यःस्थिती आहे.

चोरी, घरफोडी, दरोड्याच्या घटनांचे प्रमाण कमी व्हावे, यादृष्टीने पोलिसांची रात्रगस्त वाढविण्यात आली आहे. काही ‘फिक्‍स पाइंट’ तयार केले असून, त्याद्वारेही गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आहे. याबरोबरच गस्तीवर असणाऱ्या पोलिसांच्या कामावरही बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त

आम्ही बाहेरगावी गेलेलो असताना चोरट्यांनी माझ्या घरामध्ये घुसून चोरी केली. रोख रक्कम व दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. अनेक महिने उलटून गेल्यानंतरही पोलिसांना अद्याप चोरटे सापडलेले नाहीत. पोलिस चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासाकडे दुर्लक्ष करतात.

- कुंडलिक पाटील, नोकरदार

याची आहे गरज

  1. पोलिसांचा रस्त्यावरील वावर वाढविणे

  2. रात्रीच्यावेळी गस्त वाढविण्याची गरज

  3. सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईन लक्ष ठेवण्याची आवश्‍यकता

  4. ‘ढिम्म’ असलेल्या तपास पथकांच्या कामाला गती मिळावी

  5. ‘कोम्बिंग ऑपरेशन’ सातत्याने राबविण्याची गरज

loading image
go to top