पवार- शेट्टी यांच्यात मैत्रीचा धागा गुंफण्यामागे आहे हा हात...  

satish kakde
satish kakde

सोमेश्वरनगर (पुणे) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांना विधान परिषदेवर संधी देण्याबाबत आज माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या निवासस्थानी चर्चा झाली. या संधीमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पुन्हा सत्तेची ऊर्जा मिळणार आहे. या घडामोडींमध्ये शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी मध्यस्थाची भूमिका बजावली. यानिमित्ताने काकडे-पवार यांच्यातील बंधही आणखी वृध्दींगत झाल्याचे बोलले जात आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना मागील पंचवार्षिक काळात भाजपसोबत सत्तेत होती. सत्तेचा वाटा म्हणून स्वाभिमानीच्या सदाभाऊ खोत या कार्यकर्त्यास भाजपकडून विधान परिषदेवर घेण्यात आले होते. परंतु, खोत यांनी स्वाभिमान सोडून भाजपमध्ये विलिन होण्यात धन्यता मानली. तसेच, विविध मुद्दयांवरून मतभेद होत गेल्याने स्वाभिमानीने भाजपशी फारकत घेतली. 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला स्वाभिमानीने मनापासून साथ दिली. महाआघाडीची समीकरणे जुळत असताना स्वाभिमानी आणि मित्रपक्ष काहीसे बाजूला पडले. परंतु, आता विधान परिषदेच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या कोट्यातून स्वाभिमानीला एका जागेवर संधी देण्याबाबत हालचाली सुरू होत्या. राजू शेट्टी यांची पक्षांतर्गत चर्चा बाकी असल्याने बराच खल सुरू होता. यामध्ये शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी शेट्टी यांचे मन वळविण्यात मोलाची भूमिका पार पाडली. तसेच आज बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी पवार आणि शेट्टी यांची बैठक घडवून आणण्यातही मोलाची भूमिका बजावली. खासदार सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होत्या. आज जवळपास दोन- अडीच तास ही नेतेमंडळी सोबत होती. एकत्रित भोजनाचाही या मंडळींनी आस्वाद घेतला.

काकडे म्हणाले, शेट्टीसाहेबांच मन वळविण्यात यश मिळाले. याशिवाय आजच्या चर्चेत काही छोट्या मोठ्या गोष्टीत मतैक्य घडवून आणता आले. पवारसाहेब हे दिग्गज नते आहेत. त्यांनी संधी देणे, शब्द देणे, ही मोठी गोष्ट आहे. खासदार सुप्रिया सुळेदेखील त्यांच्यासोबत सहभागी होत्या.   

दरम्यान, या घडामोडीच्या निमित्ताने पवार आणि काकडे या सन १९६७ पासून सुरू झालेल्या जुन्या वादालाही आपोआप तिलांजली मिळाली. हा विषयही न निघता विषय संपला आहे. बारामती तालुक्यातील सहकारी संस्था, जिल्हा बँक, सोमेश्वर कारखाना ताब्यात असलेल्या काकडे गटाने सन १९६७ च्या पहिल्या निवडणुकीपासून शरद पवार यांच्याशी सवतासुभा मांडला होता. तब्बल सन १९९२ पर्यंत शरद पवार यांना कारखान्याच्या सत्तेपासून रोखले होते. 

शरद पवार यांना सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष कै. बाबालाल काकडे यांचा कडवा विरोध होता. यानंतर काकडे गटाचे वारसदार मानले गेलेले सतीश काकडे यांनीही सन २००२ पासून विरोध कायम ठेवला होता. मात्र, सतीश काकडे यांनी अजित पवार यांच्यावर वेळोवेळी टिका करताना शरद पवार यांच्याबाबत आदर ठेवला होता. टिकेचा अधिकार बाबालाल काकडे यांचा असल्याचे त्यांचे ठाम मत होते. मात्र, आज शरद पवार यांच्यासोबत शेतीचे प्रयोग बघताना, भोजन घेताना आदर द्विगुणित झाल्याचे सतीश काकडे यांनी सांगितले. 

सतीश काकडे यांनी दोन वर्षापूर्वीच अजित पवार यांना निंबूत गावात बोलवून त्यांची मिरवणूक काढून काकडे-पवार वादास तिलांजली देण्यात आली होती. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही त्यांनी सुप्रिया सुळे, अजित पवार यांचे काम केले होते. आता शरद पवार यांच्याशी भेटीगाठी वाढवून काकडे-पवार बंध आणखी घट्ट झाले आहेत. आज सतीश काकडे यांचा वाढदिवस होता. पवार यांनी काकडे यांना वाढदिवसानिमित्त आज शुभेच्छाही दिल्या.   

काकडे म्हणाले, शरद पवार हे देशाचे दिग्गज नेते असून राजकारणाच्या पलिकडचे व्यक्तिमत्व आहे. शेतकऱ्यांचा कळवळा असणारे नेते आहेत. त्यांच्याबाबत मी बोलूही शकत नाही. त्यांनी आज आपुलकी दाखविल्याने आदर आणखी व्दिगुणित झाला आहे. काकडे-पवार हा वाद अजितदादांना बोलवून आधीच संपविला होता.   
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com