लंकेश प्रकरणातील 3 आरोपींची दाभोलकरांच्या हत्येवेळी रेकी

प्रियंका तुपे
रविवार, 26 ऑगस्ट 2018

अंदुरेच्या मित्रांकडून जप्त केलेले काळ्या रंगाचे पिस्तुल हे दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरले असण्याची शक्यता असून, हे पिस्तुल गौरी लंकेश प्रकरणातील आरोपींनी सचिन अंदुरेपर्यंत पोचवले, अशी माहिती सीबीआय सूत्रांनी दिली.

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाशी गौरी लंकेश हत्याप्रकरणाचा संबंध असून, लंकेश प्रकरणातील 3 आरोपींनी दाभोलकर यांच्या हत्येसाठी रेकी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच दाभोलकर प्रकरणातील संशयित मारेकरी सचिन अंदुरेचा साथीदार शरद कळसकर यालाही तपासासाठी सीबीआय कोठडीची आवश्यकता असून, त्याला 29 ऑगस्टला सीबीआय अटक करण्याची शक्यता आहे. सध्या शरद कळसकर मुंबई एटीएसच्या कोठडीत असून 28 ऑगस्टला त्याची तेथील पोलिस कोठडी संपणार आहे. 

रविवारी सीबीआयने दाभोलकर यांचा संशयित मारेकरी सचिन अंदुरेला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्याच्या सीबीआय कोठडीत 30 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच. आर. जाधव यांनी अंदुरेच्या कोठडीत वाढ केली. यावेळी न्यायालयात सीबीआयच्या वकिलांनी दाभोलकर प्रकरणात शरद कळसकर याच्याकडे तपास करण्यासाठी सीबीआयला त्याच्या कोठडीची आवश्यकता आहे, असे सांगितले.

सीबीआयचे वकील अॅड. विजयकुमार ढाकणे यांनी पोलिस कोठडीसाठी प्रतिवाद करताना न्यायलयाला सांगितले, सचिन अंदुरेने ज्या शस्त्राने हत्या केल्याचा संशय आहे. ते पिस्तूल व काडतुसे त्याच्या औरंगाबादमधील मेव्हण्याकडे ठेवले होते. शुभम सुरळे याने ते पिस्तुल त्याचा मित्र रोहित रेगेला दिले. औरंगाबाद पोलिसांनी हे शस्त्र ठेऊन घेणाऱ्या शुभम सुरळेसह तिघांना अटक करुन त्यांच्याकडून पिस्तुल जप्त केले आहे. या पिस्तुलाचा संबंध गौरी लंकेश हत्येशी असण्याची शक्यता आहे. याबाबत तपास सुरु असून, बॅलेस्टिक रिपोर्ट आल्यावर त्याबद्दल सांगता येईल.

तसेच मुंबई एटीएसच्या कोठडीत असणाऱ्या अंदुरेचा साथीदार शरद कळसकरकडेही याबाबतचा तपास करायचा असून, त्यासाठी त्याचीही सीबीआय कोठडी आवश्यक आहे.

यावर आरोपीचे वकील अॅड. प्रकाश सालसिंगीकर यांनी युक्तिवाद करताना सांगितले, की सीबीआय प्रत्येकवेळी नवीन थिअरी मांडते. आताही सीबीआय अंधुरेच्या बाबतीत तपासात निष्कर्षापर्यंत पोचली आहे. याआधी मारेकरी म्हणून सारंग अकोलकर व विनय पवार यांची नावे होती. 
    
अंदुरेच्या मित्रांकडून जप्त केलेले काळ्या रंगाचे पिस्तुल हे दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरले असण्याची शक्यता असून, हे पिस्तुल गौरी लंकेश प्रकरणातील आरोपींनी सचिन अंदुरेपर्यंत पोचवले, अशी माहिती सीबीआय सूत्रांनी दिली. त्यामुळे दाभोलकरांच्या आणि गौरी लंकेश हत्येसाठी एकच पिस्तुल वापरले. असा संशय निर्माण झाला असून, त्याबाबतची स्पष्टता बॅलेस्टिक रिपोर्ट आल्यानंतर होईल. 

दरम्यान, शरद कळसकरला 29 ऑगस्टला सीबीआय दाभोलकर प्रकरणात अटक करण्याची शक्यता आहे. लंकेश प्रकरणातील अमित डिगवेकर, अमोल काळे व आणखी एका आरोपीची सचिन अंधुरेसोबत एकत्र चौकशी करायची असल्याने या तिघांनाही लवकरच सीबीआय अटक करण्याची शक्यता आहे.

Web Title: Three accused in the Lankesh and Dabholkar Case