बहाद्दराने चक्क एका हॉटेलमध्ये चोरी करून सुरू केले नवीन हॉटेल

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

एका गावातील हॉटेलमध्ये चोरी करून त्यातील वस्तूंचा वापर करीत चक्क दुसऱ्या गावात नवीन हॉटेल सुरू केल्याचा प्रकार पिंपरी सांडस (ता. हवेली) येथे घडला. चो

वाघोली : एका गावातील हॉटेलमध्ये चोरी करून त्यातील वस्तूंचा वापर करीत चक्क दुसऱ्या गावात नवीन हॉटेल सुरू केल्याचा प्रकार पिंपरी सांडस (ता. हवेली) येथे घडला. चोरी करणाऱ्या तिघांना लोणीकंद पोलिसांनी अटक केली असून, सुमारे 1 लाख 70 हजार रुपये किमतीचा माल हस्तगत केला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मनोज रामभाऊ कनिचे (वय 28), राहुल रामभाऊ कनिचे (वय 23), विशाल मधुकर उंबरे (वय 20) सर्व रा. तुळापूर, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांनी तुळापूर येथील त्रिवेणी हॉटेलचे दरवाज्याचे कडीकोयंडा व कुलूप तोडून हॉटेलमधील स्वयंपाकाची भांडी, फ्रिज, डीप फ्रीज, मिक्सर ग्राईंडर, एलईडी टिव्ही, सीसीटीव्ही, डीव्हीआर असा एकूण 66,000 रुपये किंमतीच्या वस्तू चोरून नेल्या.

हॉटेलचे मालक प्रसन्ना शंभू हेगडे हे लॉकडॉउनमुळे गावी गेले होते. ते परत आल्यानंतर त्यांना चोरीचा प्रकार कळला. त्यांनी लोणीकंद पोलिसांत फिर्याद दिली. लोणीकंद पोलिस  ठाणे हद्दीतील हॉटेल, लॉज, धाबे तपासात असताना पोलिस हवालदार बाळासाहेब सकाटे, ऋषिकेश व्यवहारे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पिंपरी सांडस गावच्या हद्दीत अष्टापुर- उरुळी कांचन रोडवर राजयोग नावाचे हॉटेल गेल्या 15 दिवसांपासून सुरू झालेले असून, तेथे काही जुन्या हॉटेलच्या वस्तू वापरात आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तेथे जाऊन खात्री केली असता, तेथे दोन व्यक्ती टाटा कंपनीच्या टेम्पोमधून हॉटेलचे सामान उतरवित असताना दिसल्या. गुन्हे शोध पथकाने अचानकपणे छापा घातला असता तेथे चोरीस गेलेल्या सर्व वस्तू मिळून आल्या. फिर्यादी हेगडे यांनी या वस्तू ओळखल्या. यानंतर तिघांना ताब्यात घेण्यात आले. ही कामगिरी ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलिस उपअधीक्षक डॉ. सई भोरे पाटील, पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस उपनिरिक्षक हणमंत पडळकर, गुन्हे शोध पथकाचे बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाने, दत्ता काळे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, संतोष मारकड, सूरज वळेकर यांनी केली.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three arrested for theft at Pimpri Sands