तीन तासांनंतर बिबट्या विहिरीबाहेर.. 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

आळेफाटा -  गुळुंचवाडी (ता. जुन्नर) येथे पिंपळझाप परिसरातील एका विहिरीत भक्ष्याचा शोध घेणारा बिबट्या पडला. त्याने बराच वेळ बाहेर येण्याचा प्रयत्न केला, पण त्याला बाहेर येणे शक्‍य झाले नाही. काही वेळानंतर परिसरातील नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनीही त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनाही ते शक्‍य झाले नाही. त्यानंतर अखेरीस माणिकडोहच्या बिबट्या निवारा केंद्राच्या रेस्क्‍यू टीमला पाचारण करण्यात आले.

आळेफाटा -  गुळुंचवाडी (ता. जुन्नर) येथे पिंपळझाप परिसरातील एका विहिरीत भक्ष्याचा शोध घेणारा बिबट्या पडला. त्याने बराच वेळ बाहेर येण्याचा प्रयत्न केला, पण त्याला बाहेर येणे शक्‍य झाले नाही. काही वेळानंतर परिसरातील नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनीही त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनाही ते शक्‍य झाले नाही. त्यानंतर अखेरीस माणिकडोहच्या बिबट्या निवारा केंद्राच्या रेस्क्‍यू टीमला पाचारण करण्यात आले. जवळपास तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर पिंजऱ्यातून विहिरीत उतरून काही अंतरावरून कपारीत बसलेल्या बिबट्याला भुलीचे इंजेक्‍शन मारले व त्यानंतर त्याला सुरक्षित बाहेर काढले. 

येथील पिंपळझाप परिसरात तुकाराम दगडू औटी व इतरांच्या मालकीच्या सामाईक विहिरीत, रविवारी पहाटेच्या सुमारास एक बिबट्या पडल्याचे संबंधितांच्या निदर्शनास आले. त्यानंतर संबंधितांनी बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला. त्यानंतर त्यांनी याबाबत तातडीने वनविभागाला कळविले. दरम्यान, ही विहीर अतिशय खोल असून, विहिरीच्या पाण्यात पोहून दमलेल्या बिबट्याने बसण्यासाठी विहिरीतील कपारीचा आधार घेतला. दरम्यान, माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्राच्या रेस्क्‍यू टीमने रविवारी दुपारी विहिरीत पिंजरा सोडून बिबट्यास विहिरीतून बाहेर काढण्यासाठी जवळपास तीन तास प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण बिबट्या पिंजऱ्यात येत नव्हता. अखेर दुपारी एकच्या सुमारास बिबट्या निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख व डॉ. महेंद्र ढोरे हे पिंजऱ्यातून विहिरीत उतरले. त्यांनी कपारीत बसलेल्या बिबट्याला दूरवरून भुलीचे इंजेक्‍शन मारल्यानंतर बिबट्याला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. याप्रसंगी ओतूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी. सी. येळे, प्रभारी वनपाल डी. डी. फापाळे, वनरक्षक बी. एस. शेळके, वन कर्मचारी जे. टी. भंडलकर उपस्थित होते. दरम्यान, या बिबट्यास माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात हलविण्यात आले असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

हा बिबट्या बहुतेक भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडला असावा, त्याला बाहेर काढण्यासाठी तीन तास अथक परिश्रम घ्यावे लागले. याबाबत संबंधित ग्रामस्थांनी देखील आम्हाला मदत केली. त्याला भुलीचे इंजेक्‍शन देऊन पिंजऱ्यातून वर काढण्यात आले आहे. सध्या त्याला बिबट्या निवारा केंद्रात हलविले आहे. या कामी डॉ. अजय देशमुख व डॉ. महेंद्र ढोरे यांची मदत झाली. 
- डी. डी. फापाळे, वनविभागाचे प्रभारी वनपाल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three hours later leopard wells out