Baramati Crime News : बारामतीत आठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा कोयता थरार... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Baramati Crime News

Baramati Crime News : बारामतीत आठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा कोयता थरार...

बारामती - शहरातील महाविद्यालयीन युवकांनी शनिवारी संध्याकाळी शहरात मद्यपान करुन अक्षरशः फिल्मी स्टाईलने धिंगाणा घातला. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी या बाबत माहिती दिली. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात एक तर बारामती शहर पोलिस ठाण्यात दोन असे तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून जीवे मारण्याचा प्रयत्न व दरोडा अशी कलमे या युवकांवर लावण्यात आली आहेत. आठ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या पैकी एक जण अल्पवयीन आहे.

अनिश सुरेश जाधव, प्रथमेश विश्वनाथ मोरे, चिराग नरेश गुप्ता (वय 20, रा. प्रगतीनगर), पियुष मंगेश भोसले, विशाल अनिल माने, चेतन पोपट कांबळे, (तिघेही रा. आमराई), शामुवेल सुरेश जाधव (रा. वसंतनगर) यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. एखादया चित्रपटात शोभावा असा हा प्रकार शहरात हजारो लोकांच्या समक्ष घडला. संध्याकाळी तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत या आठ जणांच्या टोळक्याने कोमल रेस्टॉरंटमध्ये मद्यपान केल्यानंतर बिलाची मागणी केल्यावर बाटली फोडून व कोयता दाखवून त्यांनी तोडफोड केली. गल्ल्यातील रोकड काढत एका ग्राहकाचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर बाहेरील दुचाकी वाहनांची तोडफोड केली.

त्यांनतर एमआयडीसी रेल्वे गेटजवळील शौर्य मोबाईल शॉपी येथे कोयत्याचा धाक दाखवून रोकड काढून घेतली. पाटस रस्त्यावरील सराफ पेट्रोल पंपावर आले, दोन्ही दुचाकीत त्यांनी एक हजारांचे पेट्रोल भरले. पैसे मागितल्यावर कोयत्याने मारहाण केली. या वेळी पेट्रोल भरण्यास आलेले गणेश चांदगुडे यांच्या मनगटाला कोयता लागला. त्या नंतर टीसी कॉलेजसमोरील वाहनांची तोडफोड करत पर्ण स्नॅक सेंटर येथे काऊंटरच्या काचा बरण्यांची तोडफोड केली. तेथील अमरिश चौधरी याच्या मानेवर कोयत्याने वार केला पण तो हाताने अडविल्याने त्याच्या तळहातावर जखम झाली. तेथील गल्ल्यातील पैसे काढून हे टोळके कॉलेज ग्राऊंडच्या दिशेने पळून गेले.

दरम्यान आठ आरोपींपैकी पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून उर्वरित तिघांच्या शोधासाठी पोलिस पथके तपास करीत आहेत, असे इंगळे यांनी सांगितले. यातील अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सर्वच आरोपी विद्यार्थी....

यातील आठही जण महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याची माहिती गणेश इंगळे यांनी दिली. केवळ स्टंटबाजीच्या उद्देशाने त्यांनी ही तोडफोड केली असून पोलिस या सर्वांकडे सखोल तपास करीत आहेत. अनेकांच्या पालकांना आपल्या मुलांचे हे प्रताप पाहिल्यानंतर धक्काच बसला आहे. दरम्यान विद्यार्थ्यांकडून कोयत्यासारख्या हत्यारांचा होणारा वापर चिंताजनक असून सर्वच पालकांनी आपल्या मुलांकडे बारकाईने लक्ष देण्याचे आवाहन गणेश इंगळे यांनी केले आहे.