आंबेगावकरांनी करून दाखवलं..कोरोनामुक्त तालुक्‍याचा मिळवला मान... 

ambegoan
ambegoan

मंचर (पुणे) : पुणे शहरात आज कोरोना हाहाकार घालत आहे. त्यावेळी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कमी अधिक प्रमाणात कोरोना आहे. मात्र, जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्‍यात अजूनपर्यंत कोरोनाला चंचूप्रवेशही करता आला नाही. प्रशासन व पोलिसांनी एकजुटीने केलेले काम आणि त्याला कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेली भक्कम साथ, यामुळे कोरोनाला आंबेगाव तालुक्‍यात रोखण्यात यश आले आहे. 

तालुक्‍याचा तेरा वेळा सर्वे 
आंबेगाव तालुक्‍यात असलेल्या 50 हजार कुटुंबातील दोन लाख 54 हजार व्यक्तींचा आतापर्यंत तेरा वेळा सर्वे करण्यात आला. तालुक्‍यातील 103 गावांत ग्रामपंचायतींनी लॉकडाउनची काटेकोरपणाने अंमलबजावणी करून प्रतिबंधक औषधांची फवारणी केली. पुणे- मुंबईतून आलेल्या विनापरवाना व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी धडक कारवाई करून गुन्हे दाखल केले. प्रशासनातील सर्वच अधिकाऱ्यांनी समन्वय साधून एकजुटीने काम केले. पर्यायी व्यवस्थेसाठी 330 बेडची यंत्रणा उभी केली आहे. 

वैद्यकीय साहित्य मुबलक 
आंबेगाव तालुक्‍यात दोन महिन्यांपूर्वी लॉकडाउनची अंमलबजावणी सुरू झाली. आरोग्य, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक व ग्रामपंचायतीचे कर्मचाऱ्यांनी प्रत्येक कुटुंबाला भेट देवून सर्दी, खोकला, ताप, निमोनिया, मधुमेह, रक्तदाब, साठ वर्षापुढील व्यक्ती आणि परराज्यातून व पुणे- मुंबईतून आलेल्यांची माहिती गोळा केली.

कामगारमंत्री वळसे पाटील हे दररोज अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून आवश्‍यक असलेल्या वैद्यकीय साहित्याचा पुरवठा वेळेत होण्यासाठी लक्ष देत आहेत. भीमाशंकर साखर कारखाना, शरद बॅंक यांच्या माध्यमातून मास्क, सॅनीटायझर, हॅन्डग्लोज, उपकरणे, औषधांचा पुरवठा आरोग्य केंद्रांना करण्याच्या सूचना वळसे पाटील यांनी वेळोवेळी दिल्या होत्या. वैद्यकीय साहित्य वेळेत मिळाल्याने कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या योद्‌ध्यांना बळ मिळाले. मंचर, घोडेगाव, कळंब, अवसरी खुर्द आदी गावे व उपजिल्हा रुग्णालय मंचर व घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात निर्जंतुकीकरण फवारणी गोवर्धन दूध प्रकल्प व रजनी फाउंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांच्या माध्यमातून केली. 

जनजागृती, निर्जंतुकीकरणावर भर 
सर्वेसाठीच्या पथकात एकूण एक हजार 400 जणांचा समावेश होता. पहिल्या सर्वेमध्ये प्राप्त झालेल्या माहितीनुसार, होम क्वारंटाइनची मोहीम प्रभावीपणे राबविली. सदर मोहीम आजही आंबेगाव जुन्नर विभागाचे प्रांत अधिकारी जितेंद्र डूडी यांच्या मार्गदर्शनाखाली काळजीपूर्वक प्रशासनाकडून राबविली जात आहे. आजाराविषयी जनजागृती व्हावे व त्याचे गांभीर्य नागरिकांना समजावे, या उद्देशाने ग्रामपंचायतींनी गाव व वाड्यावस्त्यांवर ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती केली. त्याचाही चांगला परिणाम जाणवला. प्रत्येक ग्रामपंचायतीने सॅनिटायझर, मास्कचे वाटप करून गाव निर्जंतुकीकरण केले, असे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी सांगितले. 

पोलिसांचा बडगा 
नियमाची पायमल्ली करणाऱ्या व विनाकारण फिरणाऱ्यांना मंचर व घोडेगाव पोलिसांनी कायद्याचा बडगा दाखविला. 330 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले, अशी माहिती खेड विभागाचे उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे यानी दिली. पोलिस व महसूल खात्याने तालुक्‍याच्या पेठ, भीमाशंकर, कळंब, गिरवली, ढाकळे, रांजणी, रोडेवाडी फाटा, लोणी, शिरदाळे सीमा सील केल्या होत्या. त्यामुळे आंबेगाव तालुक्‍यात विनापरवाना येणाऱ्यांना रोखण्यात यश आले, असे मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे व घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांनी सांगितले. 

खबरदारीचा उपायही तयार 
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खबरदारीचा उपाय म्हणून "कोव्हिड 19'साठी कोरोना केअर सेंटर भीमाशंकर आयुर्वेदिक हॉस्पिटल वडगाव काशिंबेग, एमटीडीसी भक्तनिवास राजपूर आणि अनुसूचित जाती जमाती वसतिगृह पेठ येथे उभारण्यात आले असून, एकूण 300 बेडची व्यवस्था केली आहे. कोरोनाबाधित गंभीर रुग्णाच्या उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात डीसीएचसी केंद्र उभारले असून, एकूण तीस बेडची व्यवस्था आहे, असे तहसीलदार रमा जोशी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी सांगितले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


एकंदर प्रशासनाने केलेल्या या कामांचा चांगला परिणाम झाला असून, आंबेगाव तालुक्‍याने कोरोनासारखे महाभयंकर संकट लीलया थोपवले आहे. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com