esakal | मार्केटयार्डातील भुसार विभागातील व्यवहारावर वेळेवर मर्यादा

बोलून बातमी शोधा

market yard

मार्केटयार्डात भुसार व्यवहाराच्या वेळेवर मर्यादा; सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत परवानगी

sakal_logo
By
प्रविण डोके

पुणे : मर्यादित ग्राहक आणि कमी वेळेत त्या त्या दिवशीचा बाजार थाबविण्यावर बाजार समिती प्रशासनाने भर दिला आहे. त्यामुळे गुळ-भुसार बाजार सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेतच सुरू राहणार आहे. गर्दी टाळण्यासाठी या विभागातील व्यवहाची वेळ कमी करण्यात आली आहे.

व्यापाऱ्यांनी मर्यादित मालाची आवक मागवून सायंकाळी चारपर्यंतच लोडींग आणि अनलोडींग करायची आहे. तसेच चार वाजल्यानंतर बाजारात कोणीही थांबू नये. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी भुसार विभागातील व्यवहाराची वेळ कमी करण्यात आली आहे. तसेच भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा, केळी, फुले आदी विभागातील व्यवहाराची वेळ पहाटे ३ ते दुपारी १ अशी करण्यात आलेली आहे. तर भाजीपाला, कांदा-बटाटा आणि फळ विभाग बाह्य पाकळ्या आणि अंतर्गत पाकळ्या दिवसाआड सुरू ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या विभागातील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात बाजार प्रशासनाला यश आले असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.

हेही वाचा: ...अन् मध्यरात्री १२ वाजता उपलब्ध झाला ऑक्सिजन

बाजरात पासशिवाय प्रवेश नाही, किरकोळ व डमी विक्रेत्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील बहुतांश विभागातील गर्दी कमी झाली आहे. रिक्षाला बंदी घालण्यात आली आहे. मार्केट यार्डात येणारे सर्व रस्ते बॅरिगेटन लावून अडविण्यात आले आहेत. माल घेऊन येणाऱ्या तसेच माल घेऊन जाणाऱ्या चाहनांसाठी वेगवेगळ्या गेटने प्रवेश दिला जात आहे. एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, यासाठी बाजार समितीचे कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी खबरदारी घेत आहेत. त्यामुळे नेहमी गर्दीने गजबजणाऱ्या मार्केटयार्डातील गर्दी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

''मार्केट यार्डातील किराणा दुकानांना महापालिकेने दिलेल्या सकाळी ७ ते ११ या वेळेतच परवानगी देण्यात आली आहे. तसेच कोविडचे सर्व नियम पाळून त्यांनी दुकाने सुरू ठेवायची आहेत. अन्यथा नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.''

- मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

बाजारात ८२६ वाहनांतून आवक

भाजीपाला, फळे आणि कांदा-बटाटा विभागात ८२६ वाहनातून विविध प्रकारच्या भाज्या, कांदा-बटाटा आणि फळांची बुधवारी आवक झाली. या वाहनांतून १७ हजार ७८८ क्विंटल माल बाजारात विक्रीसाठी आला होता. तर कांद्याची ४ हजार ५३० किंटलची आवक झाली. कडक निबंध असले, तरी बाजारात विक्री आवक होत आहे. योग्य नियोजनामुळे बहुतांश मालाची विक्रीही होत असल्याची माहिती फळ विभाग प्रमुख बाबासाहेब बिबवे आणि तरकारी विभाग प्रमुख दत्तात्रय कळमकर यांनी दिली.

हेही वाचा: मुळा-मुठा नदीचे व्यावसायिक क्षेत्रात रूपांतर कशासाठी ?