
दोन लाख पुऱ्या अन् पाच पिंप गुळवणी
निरगुडसर, ता. १५ ः कोरोनामुळे गेली दोन वर्ष हनुमान जयंतीचा महाप्रसाद बनला नाही. गाव बंद करण्याची वेळ आली होती. परंतु, यंदा कोरोनाचे सावट दूर झाल्याने पुन्हा एकदा पुरी-गुळवणी व चटणीचा आस्वाद भाविकांना घेता येणार आहे. थोरांदळे(ता. आंबेगाव) येथे उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठया श्री हनुमान जन्मसोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पाच पिंप गुळवणी, दोन लाख पुऱ्या व एक हजार किलो कांद्याची चटणी हा महाप्रसाद बनवला जात आहे.
गावातील साडेतीनशे कुटुंबातील महिला पोळपाट व लाटणे घेऊन गावात एकत्र येऊन पुऱ्या लाटण्याचे काम करतात. तर सर्व पुरुष मंडळी पुऱ्या तळण्याचे काम करतात. ही पिढीजात महाप्रसाद बनवण्याची सुरु असलेली परंपरा कोरोनामुळे मागील दोन वर्ष खंडित झाली होती.
येथील ग्रामस्थ दरवर्षीप्रमाणे शिवकालीन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आपल्या जागृत श्री हनुमानाचा जन्मसोहळा साजरा करून हजारो भाविकांना पुरी-गुळवणी या महाप्रसादाचा आस्वाद देत असतात. यासाठी प्रत्येक कुटुंबातून पुऱ्यांसाठी गहू, चटणीसाठी कांदा देऊन ग्रामस्थांच्या एकीतून हा प्रसाद तयार केला जातो. गावात शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत महाप्रसाद तयार करण्याचे काम सुरू होते. या प्रसंगी माजी सरपंच सीताराम गुंड, सुरेश टेमगिरे, बाळासाहेब टेमगिरे, प्रविण विश्वासराव, दामोदर टेमगिरे, डॉ. दत्ता विश्वासराव, श्रीराम टेमगिरे, संतोष टेमगिरे, ज्ञानेश्वर टेमगिरे, संतोष टेमगिरे, सुरेश विश्वासराव, दत्तात्रय विश्वासराव, बाबू टेमगिरे, संजय मिंडे, गोरक्ष करंडे, विकास मिंडे आदी उपस्थित होते.
शनिवारी (ता. १६) पहाटे पाच ते सात या वेळेत नंदू महाराज सोनवणे (रांजणी) यांचे हनुमान जन्माचे कीर्तन होणार आहे. सहा वाजून २१ मिनिटांनी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित भाविकांना ''पुऱ्या गुळवणीच्या '' महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी तीन ते सहा या वेळेत कुस्त्यांचा जंगी आखाडा संपन्न होणार आहे.
0143
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..