लांडेवाडीतील बैलगाडा शर्यत रद्दचा व्यवसायिकांना फटका

लांडेवाडीतील बैलगाडा शर्यत रद्दचा व्यवसायिकांना फटका

पारगाव, ता. ६ : सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर राज्यात पहिल्यांदा होणाऱ्या लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथील बैलगाडा शर्यतीला प्रशासनाने दिली होती. मात्र, केवळ आठ तासांवर आली असताना कोरोनाचे कारण देत प्रशासनाने अचानक परवानगी स्थगित केल्याने शर्यतीच्या ठिकाणी विविध प्रकारच्या दुकाने लावलेल्या व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यांच्या मदतीसाठी शिवसेनेतर्फे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोशल मीडियावरून केलेल्या आवाहनाला संपूर्ण राज्यभरातून चांगला प्रतिसाद लाभला. छोट्या मोठ्या बैलगाडा मालकांपासून ते सर्वसामान्य नागरिकांकडून १०० रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत मदत जमा होऊ लागली आहे.

राज्यातील पहिली बैलगाडा शर्यत नववर्षाच्या पहिल्या दिवशी लांडेवाडी येथे होणार होती. यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली होती. विशेष म्हणजे अनेक वर्षानंतर यात्रा पार पडणार असल्याने सुमारे शंभर ते दीडशे छोटे-मोठे व्यावसायिक दुकानदार त्यात विशेषकरून हॉटेल व्यावसायिकांनी शर्यतीच्या घाटाच्या आसपास शर्यतीच्या आदल्या दिवशी म्हणजे ३१ तारखेला दुकाने थाटून या व्यावसायिकांनी रात्र अक्षरशः थंडीत कुडकुडत काढली. हॉटेल व्यावसायिकांनी खाद्य पदार्थ तयार करून ठेवले. शासनाच्या सर्व अटींची पूर्तता केल्याने शर्यत नक्की होणार त्यामुळे सर्वजण उत्साहात होते केवळ शर्यतीला एक रात्रच बाकी असताना रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांनी शर्यतीसाठी दिलेली परवानगी स्थगित केल्याने यात्रा रद्द करण्यात आली. याचा सर्वाधिक फटका या व्यावसायिकांना बसला आहे. अनेकांनी उसने पैसे आणून भांडवल उभे केले होते. मात्र, शर्यती रद्द झाल्याने हा खर्च वाया गेला होता. हॉटेल व्यावसायिकांनी खाद्यपदार्थ अक्षरशः फेकून दिले. अनेक व्यावसायिकांना यामुळे रडू कोसळले. त्यामुळे आढळराव पाटील यांनी त्यांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. समाज माध्यमातून त्यांनी एक संदेश दिला आहे. शिवसेना नेहमीच सर्वसामान्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. या हातावर पोट असणाऱ्या व्यवसायिकांना झालेल्या आर्थिक त्रासातून बाहेर काढण्यासाठी शिरूर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सढळ हाताने शक्य होईल तेवढी मदत करण्याचे आवाहन आढळराव पाटील यांनी केले आहे.


मदत लांडेवाडी येथील कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करून आपली मदत एकत्र करून त्यात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचाही स्वतःचा सहभाग मिळवून सर्व नुकसान झालेल्या व्यावसायिकांना लवकरच अर्थसाहाय्य करण्यात येईल.
- सागर काजळे, संचालक, भैरवनाथ पतसंस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com