चपळता दाखवली म्हणून जीव वाचला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चपळता दाखवली म्हणून जीव वाचला
चपळता दाखवली म्हणून जीव वाचला

चपळता दाखवली म्हणून जीव वाचला

sakal_logo
By

महाळुंगे पडवळ, ता. ८ : लौकी (ता. आंबेगाव) येथे शुक्रवारी (ता. ७) रात्री तिघेजण मोटार सायकलवरून जात असताना पाठीमागे बसलेले प्रतीक तुकाराम थिटे यांच्यावर बिबट्याने पाठलाग करून हल्ला केला. त्यांच्या डाव्या पायाला चार ठिकाणी खोलवर जखमा झाल्या आहेत. ‘चपळता दाखवली नसती तर नक्की जीव गेला असता. पुनर्जन्मच म्हणावा लागेल...’ अशा शब्दांत त्यांनी थरार सांगितला.
चांडोली बुद्रुकहून लौकी गावाकडे नीलेश थोरात, हरीश पडवळ व प्रतीक थिटे (तिघेही रा. लौकी) हे मोटारसायकलवरून जात होते. नीलेश हे गाडी चालवत होते. पाझरघाट वस्तीनजीक शुक्रवारी रात्री मोटारसायकलचा पाठलाग करून बिबट्याने हल्ला केला. त्यात प्रतीक यांच्या डाव्या पायाला चार ठिकाणी खोलवर बिबट्याने पंजा मारून जखमा केल्या आहेत. अनाहूतपणे घडलेल्या प्रसंगामुळे तिघे जण गोंधळून गेले होते. क्षणाचाही विलंब न करता एकमेकाला सावरून मोटारसायकल जोरात पुढे नेली. ‘‘प्रतिकार केल्यामुळे जीव वाचला आहे. जवळपास १०० ते १५० फूट बिबट्या पाठलाग करत होता,’’ असे थिटे यांनी सांगितले. शनिवारी (ता. ८) सकाळी पडवळ व थोरात यांनी थिटे यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. कळंबचे वनपरिमंडल अधिकारी नारायण आरुडे व कोंडीभाऊ डोके यांनी भेट देऊन विचारपूस केली आहे.

पिकांना पाणी देणे अवघड
‘‘लौकी येथे गेल्या वर्षभरात बिबट्याने चार ते पाच जणांना जखमी केले आहे. तसेच शेळ्या, मेंढ्या व पाळीव प्राण्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. अनेकदा वनविभागाने लौकी परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला, परंतु बिबट्या पिंजऱ्याला हुलकावणी देत असल्याने वनविभागही हतबल झाला आहे. कळंब राणूबाईमार्गे लौकी, कळंब ते लौकी व आता चांडोली बुद्रुक ते लौकी हे रस्ते बिबट्याच्या उपद्रवामुळे धोकादायक आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना दिवसाही पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे,’’ असे सरपंच एकता अनिल थोरात व उपसरपंच मंगल विनोद थोरात यांनी सांगितले.

उसाची तोड सुरू झाल्याने परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. ग्रामस्थांनी रात्री अपरात्री शक्यतो बाहेर पडू नये. आवश्यकता असल्यास समूहाने फिरावे. तसेच, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
- नारायण आरुडे, वनपरिमंडल अधिकारी, कळंब (ता. आंबेगाव)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top