
जेजुरी देवसंस्थानच्या देणगीरांना आयकरातून सवलत घेता येणार
जेजुरी, ता. २२ : जेजुरीतील खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री मार्तंड देवसंस्थान समितीला आयकर विभागाकडून ‘कलम ८०जी’चे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्यांच्या देणगीदारांनी आता आयकरातून सवलत घेता येणार आहे.
विश्वस्त मंडळ सन २०१८ पासून हे देणगीदारांना आयकर सवलतीसाठी प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न करत होते. देवसंस्थानचे सनदी लेखापाल विनोद डोंगरे यांच्या पाठपुराव्यातून अखेर प्रमाणपत्र मिळवण्यात यश आले. त्यामुळे देवसंस्थानला येणाऱ्या देणगी दानाचा ओघ वाढणार आहे. भाविकभक्तांच्या देणगी स्वरूपात आलेल्या रक्कमेतून आयकरात सूट मिळणार आहे. तसेच, अनेक सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय असे विधायक उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रमुख विश्वस्त पंकज निकुडे पाटील यांनी दिली.
पुढील काळात देवसंस्थानच्या वतीने अद्ययावत हॉस्पिटल व महिलांसाठी प्रसूतिगृहाची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच, सर्वधर्मीय मोफत बिगरहुंडा सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असल्याचे निकुडे यांनी सांगितले. यावेळी विश्वस्त राजकुमार लोढा, ॲड. अशोकराव संकपाळ, सॉलिसिटर प्रसाद शिंदे, तुषार सहाणे, संदीप जगताप, शिवराज झगडे, मुख्याधिकारी राजेंद्र जगताप आदी यावेळी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..