
जुन्नरच्या बुद्ध लेण्यांना रशियन पर्यटकांची भेट
पिंपळवंडी, ता. १ : भारतातील सर्वात जास्त लेणी असलेला तालुका म्हणून प्रसिद्ध असलेल्या जुन्नर तालुक्यातील लेण्यांना रशियातील पर्यटकांनी नुकतीच भेट दिली. रशिया येथील मारिया यांच्या सोबत वेरेनोका उत्यानस्काया, अफानसेव, लिलियाना आदी रशियन पर्यटक जुन्नरच्या लेण्या पाहण्यासाठी आले होते. या पर्यटकांना सिद्धार्थ कसबे व सुदर्शन साबळे यांनी लेण्यांची माहिती दिली. पर्यटकांनी खानापूर येथील मानमोडी डोंगरावरील तसेच शिवनेरी किल्ल्यावरील बुद्ध लेणीस भेट दिली.
जुन्नरच्या बुद्ध लेणी या दोन हजार वर्षांपूर्वीच्या असून त्यांचा वापर बौद्ध भिक्खू हे राहण्यासाठी तसेच ध्यानधारणेसाठी करत असत, तीच परंपरा जपत या रशियन पर्यटकांनी या लेण्यांत ध्यान साधनेचा अनुभव घेतला.
मारिया यांनी सांगितले की, या बुद्ध लेण्या पाहून व येथील लेण्यांत विपश्यना करून मन प्रसन्न झाले तसेच या लेण्यांचा इतिहास ऐकून दोन हजार वर्षांपूर्वीचा भारत कसा होता त्याची प्रचिती आम्हाला आली. भारताचा हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
यावेळी जुन्नरचे डॉ. अमोल पुंडे यांनी जुन्नरची ग्रामीण संस्कृती त्यांना समजावून सांगितली. रशियन पर्यटकांसोबत लेणी अभ्यासक मकरंद लंकेश्वर, विनोद रायकर, प्रकाश वनवे उपस्थित होते.
जुन्नर तालुक्यात लेण्या पाहण्यासाठी अनेक विदेशातील पर्यटक येत असतात. या लेण्यांकडे जाण्यासाठी आजही व्यवस्थित मार्ग नसून कुठेही दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. जुन्नरमध्ये जागतिक पर्यटक येण्यासाठी येथील लेण्यांचा विकास करणे गरजेचे असल्याचे मत अभ्यासकांनी मांडले.
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..