
नारायणगाव, वारूळवाडी सत्ताधाऱ्यांचा विजय-NAR21B0104
नारायणगाव, ता. २२ : जुन्नर तालुक्यातील नारायणगाव व वारूळवाडी ग्रामपंचायत सदस्यांच्या दोन जागांच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत सरपंच योगेश पाटे व सरपंच राजेंद्र मेहेर यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पॅनेलचे उमेदवार अनुक्रमे अक्षय विजय वाव्हळ, नारायण वामन दुधाणे यांचा विजय झाला.
जुन्नर येथील धान्य गोदामध्ये बुधवारी (ता. २२) सकाळी दहा वाजता मतमोजणी झाली. नारायणगाव ग्रामपंचायतीचे प्रभाग चारमधील उमेदवार विजय वाव्हळ यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या सदस्याच्या एका जागेसाठी सरपंच पाटे यांच्या नेतृत्वाखालील अक्षय वाव्हळ व अपक्ष उमेदवार गिरिराज भीमराव वाव्हळ यांच्यात सरळ लढत झाली. गिरिराज वाव्हळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. चुरशीच्या निवडणुकीत सरपंच पाटे यांच्या नेतृत्वाखालील अक्षय वाव्हळ हे ८३१ मते मिळवून ६५४ मताधिक्याने विजयी झाले. गिरिराज वाव्हळ यांना फक्त १७७ मते मिळाली. याबाबत सरपंच पाटे म्हणाले, ‘‘विरोधकांना मतदारांनी नाकारले असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची ही रंगीत तालीम आहे.’’
वारुळवाडीचे माजी सरपंच देवेंद्र बनकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमधून मागील निवडणुकीत विजयी झालेले प्रभाग क्रमांक दोनमधील सदस्य श्याम दुधाणे यांचे हृदयविकाराने निधन झाले होते. रिक्त झालेल्या सदस्याच्या एका जागेसाठी सरपंच मेहेर व उद्योजक संजय वारुळे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पॅनेलचे उमेदवार नारायण वामन दुधाणे व माजी देवेंद्र बनकर, सरपंच आत्माराम संते, सतेज भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील शशिकांत सीताराम पारधी यांच्यात सरळ लढत झाली. नारायण दुधाणे हे ३९५ मते मिळवून विजयी झाले. पारधी यांना ३४१ मते मिळाली. दुधाणे ५४ मतांनी विजयी झाले. सरपंच मेहेर म्हणाले, ‘‘दुधाणे यांच्या विजयाने विरोधकांची सदस्य संख्या एकने कमी होऊन सहा झाली आहे. आमची सदस्य संख्या अकरा झाली आहे.’’
सोशल डिस्टन्सचा फज्जा
विजयानंतर दोन्ही उमेदवारांची डीजेच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली होती. नारायणगाव, वारूळवाडी परिसरात ओमिक्रॉनची रुग्णसंख्या दहा झाली आहे. मिरवणुकीत सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता. याबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अक्षय वाव्हळ
नारायण दुधाणे