राजगुरुनगरकरांना हवे हक्काचं उद्यान!
राजगुरुनगर, ता. १२ : राजगुरुनगर (ता. खेड) गावाचे शहरात रूपांतर होऊन अनेक वर्षे लोटल्यानंतरही गावासाठी एकही उद्यान नसल्याने घटकाभर फिरायला जायची नागरिकांना आणि विशेषतः मुलांना सोय नाही. त्यामुळे गावासाठी उद्यान करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
राजगुरुनगर गावाचे शहरात रूपांतर होऊन अनेक वर्षे लोटली. ग्रामपंचायतीची नगरपरिषद होऊनदेखील सात वर्षे झाली. पण, गावासाठी उद्यान झाले नसल्याने नागरिकांना कुठे फिरायला जायची सोय नाही. संध्याकाळी बाहेर पडण्यासाठी ठिकाण नसल्याने इच्छा असतानाही कुटुंबीयांना बाहेर पडता येत नाही. ज्येष्ठ नागरिकांनाही रमण्यासाठी हक्काची जागा नाही. सुटीत मुलांना बागडण्यासाठी बाग नाही.
उद्यानाची गरज आहे, परंतु ती निकडीची गोष्ट नसल्याने राजकीय मंडळींनी कधी त्याकडे लक्ष दिले नाही. सध्या फिरायला जाण्यासाठी क्रीडासंकुल हे एक ठिकाण आहे. तेथे मोठे मैदान आहे. तो मोठा दिलासा आहे. मैदानाच्या कडेला बाकडे आहेत. मुख्य इमारतीच्या मागे छोटा बगीचा आहे. तेथे मुलांसाठी चार दोन खेळणी लावण्यात आली होती. पण, त्यांची अवस्था फारशी चांगली नाही. ओपन जीमचे काही साहित्य आहे. मात्र, बगीचा म्हणून फारसे काही तिथे नाही.
राजगुरूनगरकरांना फिरायला जाण्यासाठी दुसरा पर्याय सिद्धेश्वर मंदिर आहे. अनेक लोक त्याठिकाणी जातात. तेथील वातावरण प्रसन्न आहे. तेथे असलेल्या पुष्करणीला बारमाही हिरवेकंच पाणी असते. दगडी पायऱ्या आणि कठड्यांवर बसायला जागा असल्याने तेथे बसणे आल्हाददायक वाटते. पण, पाण्याच्या भीतीमुळे लहान मुलांसाठी ही जागा सोईस्कर नाही. पूर्वी सिद्धेश्वर मंदिरासमोर बगीचा होता. पण, देखभाल होत नसल्याने सुमारे वीस वर्षांपूर्वी तो काढून टाकण्यात आला.
सध्या राजगुरुनगर बरोबरच आसपासच्या ग्रामपंचायतीही वाढत असल्याने एका सुसज्ज उद्यानाची गरज आहे. विकास आराखड्यात काही जागा राखीव ठेवल्या आहेत. पण, त्या संभाव्य रस्त्यांच्या बाजूला असल्याने अनेक वर्षे वाट पाहावी लागेल. सध्या क्रीडासंकुल परिसरात अथवा चांडोलीच्या फळरोपवाटिकेच्या आवारात शासकीय जागा उपलब्ध होऊ शकते.
नाना नानी पार्कची गरज
आमदार दिलीप मोहिते यांनी तिन्हेवाडी रस्त्याजवळ चासकमानच्या कालव्याच्या दक्षिण बाजूला ज्येष्ठ नागरिकांच्या नाना नानी पार्कसाठी सन २०१४ पूर्वी जागा निश्चित केली होती. मात्र, त्यानंतर त्यांचा पराभव झाल्याने तो संकल्प तसाच राहून गेला. पुन्हा विजयी झाल्यावर त्यांनी नाना नानी पार्क उभारण्याचे सूतोवाच केले आहे. तो पार्क झाला तर ज्येष्ठांना दिलासा मिळेल. अनेक ज्येष्ठ नागरिक सध्या पाण्याच्या टाकीजवळच्या बाकांवर बसलेले असतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.