
झेडपीच्या शिक्षकांचे वेतन रखडले
सोमेश्वरनगर, ता. १२ : पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे फेब्रुवारीपासूनचे वेतन रखडलेले आहे. त्यामुळे विशेषतः एकल शिक्षकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रखडलेले वेतन तत्काळ न दिल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबणार आहोत, असा इशारा पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष नंदकुमार होळकर यांनी जिल्हा परिषदेस दिला.
पुणे जिल्हा परिषदेमध्ये अकरा हजार प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत. या शिक्षकांचे एप्रिल महिना निम्म्यावर आला तरीही फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांचे वेतन मिळालेले नाही. किमान फेब्रुवारी महिन्याचे वेतन तरी होईल, अशा शिक्षकांच्या अपेक्षांवर पाणी पडले आहे. त्यामुळे शिक्षकांचे गृहकर्जाचे हप्ते, विमा हप्ते, शिक्षक सोसायटीचे हप्ते थकले आहेत. शिक्षक फंडाची वर्गणीही वेळेवर जात नाही. सर्वात जास्त झळ एकल शिक्षकांना आणि सेवानिवृत्त शिक्षकांना बसत आहे. याबाबत जिल्हा शिक्षक समितीनेही शिक्षकांच्या तीव्र भावना प्रशासनास कळविल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत करावे व यासाठी यंत्रणा सुधारावी, याबाबत राज्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे. मात्र, शासनाचे अनुदान वेळेत न मिळाल्याने जिल्हा प्रशासन वेतन वेळेत करू शकले नाही. याबाबत शिक्षक वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. ३१ मार्चपूर्वी ऑनलाईन पगार बिले मंजूर न झाल्यामुळे आता ऑफलाइन बिलांची तरतूद जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाने केली आहे. मात्र, त्यालाही दहा दिवस उलटून गेले आहेत. दोन दिवसात किमान फेब्रुवारीचे वेतन जमा न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे होळकर यांनी दिला आहे. तसेच, दरमहा एक तारखेला वेतन देणार, अशा घोषणा केल्या जातात. एक तारीख सोडा दहा तारखेपर्यंत तरी वेतन करा, अशी विनंतीही केली आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..