दंतवैद्य अन् शेतकऱ्यांचा लढवय्या सेनापती

दंतवैद्य अन् शेतकऱ्यांचा लढवय्या सेनापती

संपूर्ण पुणे जिल्ह्यातील तब्बल आठ धरण प्रकल्पांचे पुनर्वसन लादलेला जिल्ह्यातील एकमेव तालुका म्हणून शिरूर प्रसिद्ध आहे. खरे तर चासकमान धरणाव्यतिरिक्त इतर सात प्रकल्पांच्या पाण्याचा बिलकूल लाभ नसताना झालेले हे भूसंपादन आणि त्यामागोमाग पुनर्वसन जमिनींच्या भूसंपादन प्रक्रियेतील प्रशासकीय संगनमताने होत असलेला गैरव्यवहार या निमित्तानेही शिरुरची अपकीर्ती आहे. या सर्व गैरव्यवहारांबद्दल उघड बोलून बाधित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी गेली पाच वर्षे अहोरात्र झटणारा एक अवलिया शिक्रापुरात आहे. योगायोग म्हणा किंवा काहीही म्हणा दंतचिकित्सेत जिल्ह्यात नावलौकीक मिळवूनही अतिरिक्त वेळ देवून अन्यायग्रस्त शेतकऱ्यांसाठी लढणारे हे आहेत, शिक्रापुरातील डॉ. खेडकर डेन्टल क्लिनिकचे संचालक डॉ. धनंजय नामदेव खेडकर.
सामाजिक कार्य आणि डॉ. खेडकर डेन्टल क्लिनिक नावाने गेल्या १३ वर्षांत तब्बल १५ हजारांवर रुग्णसेवा करणारे डॉ. खेडकर यांचा हा दोन्ही क्षेत्राचा मेळ घालून काम करण्याचा आवाका खरोखरीच वाखाणण्याजोगा आहे. सन २००७ मध्ये मुंबईतील येरला मेडिकल कॉलजेमध्ये बी.डी.एस. पूर्ण करून लगेच सन २००८ मध्ये शिक्रापुरात खेडकर डेन्टल क्लिनिक नावाने आपले हॉस्पिटल सुरू करणाऱ्या डॉ. खेडकर यांनी गेल्या १३ वर्षांत जवळपास १५ ते १८ हजार रुग्णांना आपली वैद्यकीय सेवा दिली. परिसरातील शाळा, महाविद्यालये आणि शिबिरांमध्ये मोफत दंतचिकित्सा आणि उपचारही त्यांनी दिले. मात्र, त्यांनी याच कामाबरोबर जिल्ह्यात मोठी ओळख निर्माण केली ती, पुनर्वसन गैरव्यवहार बाहेर काढून त्याविरोधात आंदोलने करणारे अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचे सेनापती म्हणून.
ही लढाई त्यांच्या स्वत:वर बेतलेल्या प्रसंगाने त्यांनी सुरू केली खरी, पण या निमित्ताने शिरूर तालुक्यात ८ प्रकल्पांमुळे सुमारे ९ हजार हेक्टर क्षेत्रावर प्रकल्प संपादनाचे शिक्के व प्रकल्प तालुक्यासाठी लाभत नसताना ३५०० हेक्टर क्षेत्राचे थेट संपादनचा प्रकार त्यांनी कागदावर आणला. विशेष म्हणजे, प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना द्यावयाच्या पुनर्वसित शेतीच्या प्रकरणांमध्ये जे काही मोठे गैरव्यवहार, फसवणूक झाल्या आहेत, त्याबद्दल सन २०१९ व २०२० मध्ये शिरूर व पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयापुढे केलेले त्यांचे हिशोब आंदोलन त्यांच्यातील सचोटी आणि सामान्य शेतकऱ्याच्या पाठीशी राहण्याची त्यांची वृत्ती त्यांना जिल्ह्यात मोठा नावलौकीक मिळवून गेली.
सध्या ते शिक्रापूरातील निष्णात दंतवैद्य आणि पुनर्वसन गैरव्यवहाराच्या विरोधातील लढवय्ये सेनापती अशा दोन्ही पातळ्यांवर लढत असून, त्यांच्यामधील लढवय्या बाणा तमाम शिरुरकरांसह प्रकल्प बाधित जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांसाठी मसिहापेक्षा कमी नाही एवढेच.

टोलनाका बंद करून दाखविला
सामाजिक क्षेत्रातील आंदोलक तेव्हाच तयार होतात, जेव्हा एखाद्या आंदोलनाचे यश जगात सिद्ध होते. सन २०१५ मध्ये चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील एक टोलनाका बेकायदेशीर चालू असून, दुसराही तत्काळ बंद करण्याबाबत स्थानिकांनी आवाज उठविला होता. अखिल भारतीय ग्राहक पंचायत, क्रांतिवीर प्रतिष्ठान, पतंजली योग समिती आणि शेतकरी संघटना यांच्या बरोबरीने स्थानिक कार्यकर्ता म्हणून डॉ. खेडकर यांनी जी कागदावरील लढाईची भूमिका यथायोग्य मांडली, त्याचे यश म्हणून हा टोलनाका आंदोलनानंतर सहाच महिन्यात शासनाला बंद करावा लागला. हा टोलनाका जसा बंद झाला, तसे डॉ. खेडकर हे सामाजिक क्षेत्रात सक्रिय झाले आणि त्यांनी पुनर्वसन गैरव्यवहारांच्या लढाईत स्वत:ला झोकून दिले.

ग्रामपंचायत राजकारणातही करून दाखविले
राजकारण शुद्धी व्हायची असेल, तर ती अगदी ग्रामपंचायत पातळीवरून. तब्बल पाच वर्षांतील सामाजिक क्षेत्रातील अनुभवाचा आणि तटस्थपणे विचार करण्याची पद्धत विकसित झाल्याने डॉ. खेडकर यांनी शिक्रापूर ग्रामपंचायत निवडणुकीत वर्षभरापूर्वी स्वत:चा स्वतंत्र पॅनेल उभा करण्याचा चंग बांधला. त्यामुळे प्रस्थापित सर्वपक्षीय सर्वच राजकारण्यांचे आडाखे चुकले. पर्यायाने शिक्रापूर ग्रामपंचायतीचा एकूण निकाल पाहता त्यांची लढत परिणामकारक ठरली. त्याबद्दल तालुक्यातही मोठी चर्चा झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com