
‘कोणतीही बोलीभाषा ही समृद्ध असतेच’
तळेगाव ढमढेरे, ता. २७ : दररोजच्या व्यवहारात प्रत्येकाने मराठी भाषेचा आग्रह धरणे ही काळाची गरज असून, आपली मातृभाषा मराठी ही वैभवशाली भाषा आहे, असे मत प्रसिद्ध हास्य अभिनेते कवी बंडा जोशी यांनी व्यक्त केले.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात मराठी विभागातर्फे आयोजित मराठी राजभाषा दिन व युवांकुर भित्तिपत्रक आणि पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या प्रकाशन समारंभात बंडा जोशी बोलत होते. शिक्षण संस्थेचे संचालक महेशबापू ढमढेरे अध्यक्षस्थानी होते.
जोशी पुढे म्हणाले,‘‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भाषा वापरण्याच्या संदर्भात असलेला न्यूनगंड दूर होणे गरजेचे आहे. कोणतीही बोलीभाषा ही समृद्ध असते. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाने आपल्या भाषेतून विचारांची देवाण-घेवाण केली तर निश्चित मराठी भाषेला वैभव प्राप्त होईल. पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रम व युवांकुर भित्तीपत्रकाच्या माध्यमातून मराठी विभागाची कल्पक योजना युवकांना करियरच्या संधी उपलब्ध करून देईल.’’ आपल्या एकपात्री अभिनयातून व विविध हास्य कवितांतून जोशी यांनी उपस्थित युवक-युवतींना मंत्रमुग्ध केले.
यावेळी महेशबापू ढमढेरे यांनी युवकांना भाषेचा अभिमान बाळगण्याचा सल्ला दिला. ‘‘कविवर्य कुसुमाग्रज यांच्या विचार व लेखणीतून प्रत्येकाने प्रेरणा घेणे गरजेचे असून लुप्त होत चाललेली वाचन संस्कृती वाढविण्यासाठी वाचन करणे गरजेचे आहे,’’ असे मत ढमढेरे यांनी व्यक्त केले.
यावेळी मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या काव्यवाचन व गीतगायन स्पर्धेतील विजेत्यांना जोशी यांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. प्राचार्य अशोक नवले यांनी स्वागत केले. मराठी विभाग प्रमुख प्रा. संदीप सांगळे यांनी प्रास्ताविक केले. श्रद्धा करेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. प्रमोद पाटील व प्रा. दीपाली खोडदे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. प्रा. दत्तात्रेय कारंडे यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..