सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता
सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता

सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता

sakal_logo
By

प्रत्येक क्षेत्रात काम करत असताना पाठीवर थाप मारून बळ देणाऱ्या नेत्याची आवश्यकता असते. पुरंदर हवेली तालुक्यात महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष दिवंगत चंदुकाका जगताप यांनी अनेक कार्यकर्त्यांना घडविले, त्याचाच वारसा पुरंदर हवेलीचे आमदार व पुणे जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष संजयजी जगताप सर यांनी जपला आहे. प्रचंड ध्येयवाद, रात्रंदिवस काम करण्याची तयारी, सर्वसामान्य माणसांविषयी वाटणारी कणव, विविध आवाहनांना तोंड देण्याची तयारी यामुळेच आमदार संजय जगताप सरांनी जनमानसात स्थान निर्माण केले.

नंदकुमार सागर (राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य)
जिजामाता हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जेजुरी.

पुरंदर तालुक्याच्या विकासासाठी वेगवेगळ्या कल्पना मांडून सर्व सामान्य कार्यकर्त्यांना बळ देवून त्यांना उभे करण्याचे काम ते करीत आहेत. केवळ पुरंदर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात आपल्या कर्तृत्वाने वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या दिवंगत काकांच्या युक्ती आणि कृतींचा वारसा आमदार संजयजी जगताप सर जपत आहेत. सर्व परिपक्व गुणांमुळे त्यांना राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना लहान वयात पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद दिले.


जनतेशी नाते...
शिक्षण, सहकार, राजकारण, क्रीडा, कृषी अशा विविध क्षेत्रात काकांच्या पावलावर पाऊल ठेवून गरुडझेप घेत आपले नेतृत्व आणि कर्तृत्व सिद्ध केले. आपला व्यवसाय सांभाळत संपूर्ण पुरंदर- हवेलीमधील जनता माझे कुटुंब आहे, या भावनेतून काम सुरू केले आणि पुरंदर हवेलीच्या जनतेला कळून चुकले नात्यागोत्याच्या, गरीब-श्रीमंत या दरीच्या पलीकडे संजय सर आहेत, अशी स्वतःची त्यांनी ओळख निर्माण केली.

शेतकऱ्यांना बळ
नुसत्या शेतीवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी शेतीबरोबर जोडधंदा केला पाहिजे, यासाठी पुरंदर तालुक्यात आनंदी डेअरीच्या माध्यमातून धवलक्रांती घडवून शेतकऱ्यांना शेतीबरोबर दुग्ध व्यवसायासाठी प्रेरित केले. आज आनंदी डेअरीच्या माध्यमातून अनेक शेतकरी, तरुण यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत शेतकऱ्यांची बाजू मांडताना शेतीमालाबरोबर शेतकऱ्यांना जीएसटी मिळत नाही. त्यामुळे खत व बियाणे यावरील जीएसटी रद्द करावा असे अभ्यासू विधान करतानाचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले.

शिक्षणासह क्रीडा संस्कृतीला प्राधान्य
घरची परिस्थिती पाहता संजय सरांना परदेशी शिक्षण घेणे सहज शक्य होते. परंतु, सासवड येथे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण घेऊन व्यवस्थापन शास्त्रातील उच्च शिक्षण पुण्यात पूर्ण केले. आपण ज्या पद्धतीने शिकलो त्याच पद्धतीने माझ्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे या उद्देशाने काकांनी अतिशय कष्टाने उभ्या केलेल्या श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेची सचिव पदाची जबाबदारी पार पाडताना संस्थेच्या सर्व शाळातून ई-लर्निंग सुविधा, सुसज्ज प्रयोगशाळा, संगणककक्ष अशा अनेक सुविधा उपलब्ध करून ग्रामीण भागातील विद्यार्थी हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे, यासाठी अतोनात प्रयत्न करून विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे आज संस्थेतील अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, वकील, पोलिस अधिकारी, शिक्षक, देशसेवेसाठी आर्मीमध्ये अशा अनेक नामवंत क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याच बरोबर एमपीएससी, यूपीएससी अशा विविध स्पर्धा परीक्षा देत आहेत. तालुक्यातील युवक हा शिक्षणाबरोबरच आरोग्याने सुद्धा सक्षम असला पाहिजे, पुरंदरच्या सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे कुस्ती क्षेत्रामध्ये इच्छा असून सुद्धा तरुणांना आपले भवितव्य घडविता येत नव्हते, तरुणांची ही अवस्था पाहून शिवाजी व्यायाम मंदिर उभे करून स्वतः खर्च करत तरुणांना एक नवी दिशा देऊन दरवर्षी पुरंदर केसरी कुस्ती स्पर्धा भरवून कुस्ती क्षेत्रात आपले भवितव्य घडविण्यासाठी तरुणांना एक नवे दालन खुले करून दिले.

जनतेसाठी अर्थवाहिनी केली बळकट...
युवक, युवती, शेतकरी यांनी नोकरी, शेतीबरोबर इतर व्यवसायाकडे वळावे यासाठी ते कायम प्रोत्साहनपर कार्यक्रम आयोजित करतात. नोकरीचा प्रश्न गंभीर असल्याने व्यवसायाच्या दृष्टीने मार्गदर्शन आणि मदत करणाऱ्या उपक्रमांची गरज आहे, अशी भावना त्यामागे आहे. त्या सर्वांना व्यवसायासाठी भांडवल पुरंदर नागरी पतसंस्था, संत सोपानकाका सहकारी बँक यांच्या माध्यमातून उभे करून अनेक कुटुंब संजय सरांनी उभी केली आहेत.

माणूस वाचला अन् उभा केला
पुरंदर- हवेलीमधील लोकांना बारा ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांचे दर्शन, मुस्लिम बांधवांना हज यात्रा, ज्येष्ठ नागरिकांची सेवा अशा सर्व गोष्टींमुळे पुरंदरच्या जनतेने त्यांना श्रावणबाळ ही उपाधी दिली. आमदार संजयसर ही समाजसेवा करू शकले कारण आई आनंदीकाकी जगताप यांची प्रेरणा, थोरले बंधू भारतीय प्रशासन सेवेमधील अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप साहेब यांची भक्कम साथ, आमदार संजय सरांच्या पत्नी राजवर्धिनीताई जगताप यांचे सहकार्य, सर्व महिलांच्या आरोग्यासाठी ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून मोफत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी केलेले कार्य या गोष्टी नाकारता येणार नाहीत.

हिरा अखेर चमकलाच...
पुरंदरचे राजकारण हे दिवंगत काकांच्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, राजकारणातून सुद्धा समाजकारण करता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे काका होय. विविध कार्यकारी सोसायटी, सर्वसामान्य शेतकरी यांना विविध सुविधा उपलब्ध करणे, सासवड नगरपालिकेचे अध्यक्षपद, राज्य सहकार मंडळाचे अध्यक्षपद अशा अनेक पदावर काम करून काकांनी कामाचा मोठा डोंगर उभा केला. काकांची समाजाविषयी असणारी तळमळ आणि कणव हेच गुण संजय सरांमध्ये जाणवतात. दोन वेळा यशाने हुलकावणी देऊन सुद्धा आपल्या ध्येयापासून यत्किंचित न ढलता समाजसेवेचे व्रत चालू ठेवून पुरंदर-हवेलीच्या तरुणांच्या गळ्यातील ताईत होऊन सरांनी २०१९मध्ये विधानसभा निवडणुकीत पुरंदर हवेलीमधून अतिशय मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला. पुरंदर-हवेलीच्या जनतेने एक आपला माणूस मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी विधानसभेत संजयसरांच्या रूपाने पाठविला.

अतिशय सूक्ष्म नियोजन
आज पुरंदर-हवेलीमध्ये अनेक प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत, कायम दुष्काळग्रस्त तालुका म्हणून पुरंदरकडे पाहिले जाते, ही ओळख बदलणे, शेतीसाठी पाणी, जेजुरी एमआयडीसीमधील बंद असलेल्या कंपन्या, विमानतळ, तरुणांना रोजगार, अतिवृष्टीमुळे खराब झालेले रस्ते, वाहून गेलेले बंधारे, उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय, फुरसुंगी कचरा डेपो, पालखीमार्ग, पुणे व मुंबई येथे पुरंदर वसतिगृह उभारणे असे अनेक प्रश्न आमदार संजय सरांच्या पुढे आहेत. परंतु, मला खात्री आहे, आपल्या अभ्यासू स्वभावाने सर या सर्व प्रश्नांना लिलया सामोरे जाऊन पुरंदर हवेलीच्या लोकांना योग्य प्रकारे न्याय देतील, ज्याप्रमाणे सासवडच्या जनतेने सरांच्या नेतृत्वावर विश्‍वास दाखवून सासवड नगरपालिकेची सत्ता सरांच्या हातात दिली, अतिशय सूक्ष्म नियोजन करीत सासवड नगरपालिकेचे अध्यक्ष, नगरसेवक सर्व कर्मचारी यांनी सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करत भारतामध्ये सासवड शहराचे नाव सुवर्ण अक्षराने कोरले आहे, त्याच पद्धतीने जेजुरी नगरपालिकासुद्धा काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. अगदी तसेच पुरंदरच्या जनतेने जो विश्वास दाखविला तो विश्वास सार्थ ठरवीत संजय सर पुरंदर हवेली तालुका सुजलाम् सुफलाम् करतील यात कोणतीच शंका नाही.

विकास हाच ध्यास

“पुरंदर-हवेलीचा विकास हाच ध्यास ” या ब्रीद वाक्याप्रमाणे आमदार संजयजी जगताप अहोरात्र झटत आहेत. अगदी तळागाळातील माणूस सुद्धा त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे अवाक होत आहे. हा सगळा व्याप सांभाळत असताना ते आपल्या कुटुंबाप्रती कोणता अन्याय होणार नाही, याची सुद्धा दखल घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असताना दिसत आहेत. आपल्या कुटुंबाविषयी सांगताना ते नेहमी सांगतात की, माझी आई सासवडच्या माजी नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती राजवर्धिनीताई जगताप, चिरंजीव समरादित्य, थोरले बंधू व भारतीय प्रशासकीय सेवेत कामाने पुरंदरच्या नावाचा लौकिक वाढवणारे डॉ. राजेंद्र जगताप साहेब यांच्या सुविद्य पत्नी, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिताताई जगताप व दोन्ही विवाहित बहिणी एवढ्यापुरतेच माझे कुटुंब नसून माझ्या सर्व संस्थांतील कर्मचारी वर्ग आणि पुरंदर-हवेलीचा प्रत्येक व्यक्ती माझ्या कुटुंबातील आहेत, आणि मी या कुटुंबाचा प्रमुख किंवा घटक म्हणून काम करत असताना मला जरी कोणाच्या सुखातच नव्हे तर दुःखात मात्र मी त्या व्यक्तीच्या मागे नाहीतर बरोबर असेल. याच भावनेतून आमदार कुटुंबातील व्यक्तीचा आर्थिकस्तर उंचवण्यासाठी, निरोगी आरोग्यासाठी सतत कार्यशील असल्याचे जाणवते.

दुग्ध संस्था प्रगतिपथावर
युवकांना रोजगार मिळावा तसेच जागतिकीकरण आणि संगणक युगात आमूलाग्र बदल होत असताना अशा स्पर्धेच्या युगात सहकारी संस्था, शिक्षण संस्था, दुग्धजन्य संस्था काढून त्या टिकवणे, वाढवणे यासाठी दूरदृष्टीने निर्णय घेणारे, क्षमतेला महत्त्व देऊन घेतलेल्या निर्णयावर ठाम राहणारे आमदार मा. संजयजी जगताप हे सहकार, शिक्षण व कृषी क्षेत्रातील दृष्टे युवक आहेत. गुणवत्तेला प्राधान्य देत जे चांगले ते चांगले म्हणणाऱ्या स्पष्ट भूमिकेचा या युवकाच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या सर्व सहकारी, शैक्षणिक, दुग्ध संस्था प्रगतिपथावर आहेत.

शेतमालाला सुरक्षितता...
शेतकरी, व्यापारी, बेरोजगार युवक अशा सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन पुण्यनगरीचा आर्थिक विश्वास संपादन करून श्री. संत सोपानकाका सहकारी बँकेची स्थापना केली. आज ५०० कोटी ठेवींचा टप्पा पार करत खऱ्या अर्थाने पुरंदरची व पुणे जिल्ह्याची अर्थवाहिनी झाली. बँकेच्या माध्यमातून शेकडो तरुणांना नोकरी, बेरोजगारांना रोजगार निर्माण करून दिला. पुरंदरमधील शेतकरी कष्टाळू आहे. परंतु, घाम गाळून तयार केलेल्या शेतमालाला त्यामध्ये फळे, पालेभाजी, फुले यांना बाजारामध्ये मिळणाऱ्या किमतीची अनिश्चितता यासाठी व शेतकरी माल खराब होईल या भीतीने कवडीमोल भावाने विक्री करत आहे, हे पाहून संवेदनशील मनाच्या संजयजी जगताप यांनी भव्य असे कोल्ड स्टोअरेज खळद येथे उभे केले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची सुरक्षितता मिळवून दिली. पुरंदर परिसरातील शेतकऱ्यांचा विकास हाच ध्यास डोळ्यासमोर ठेवून त्यांनी पुरंदर मिल्क अँड ॲग्रोची स्थापना केली. शेतकऱ्यांची संस्था स्थापनेपूर्वी दुग्ध व्यवसायामध्ये होणाऱ्या फसवणुकीपासून सुटका केली. आज जवळपास सत्तरच्या आसपास दूध संकलन केंद्र निर्माण करून बेरोजगार युवकांना नोकरीची संधी निर्माण करून शेतकऱ्यांसाठी धवलक्रांती घडविली.

कला संस्कृती जोपासली
शेतकऱ्यांसह गोरगरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण उपलब्ध व्हावे, स्पर्धेच्या युगात त्यांना सर्व सोयी उपलब्ध व्हाव्यात, या उदात्त हेतूने दिवंगत चंदुकाका जगताप यांनी श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेची स्थापना केली, आज त्या संस्थेच्या सचिवपदाची धुरा संजय सर अतिशय लिलया पेलताना दिसतात. “शील घडविते तेच खरे शिक्षण” या संस्थेच्या बोध वाक्याप्रमाणे आचार-विचार सुसंस्काराने प्रत्येक विद्यार्थी हा परिपूर्ण असला पाहिजे या उदात्त हेतूने ग्रामीण भागात, डोंगरी दुर्गम परिसरात विद्येचे नंदनवन फुलविले. आज संस्थेच्या अनेक विद्यालयाचे निकाल १०० टक्के लागत आहेत. पुरंदरचे वैभव असलेले परंतु अलीकडच्या काळात लोप पावत चाललेल्या कुस्ती या मर्दानी खेळास पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे, आजची पिढी निरोगी, निर्व्यसनी बलवान व्हावी यासाठी शिवाजी व्यायाम मंदिराची स्थापना करून अनुभवी प्रशिक्षकांची नियुक्ती करून या खेळाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी पुरंदर कुस्ती, पुरंदर केसरी अशा विविध स्पर्धा आयोजित करून या खेळास सन्मान प्राप्त करून दिला. पुरंदरमध्ये ऐतिहासिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, साहित्यिक वारसा जतन व्हावा त्याची महती व माहिती तरुण पिढीला समजावी, लोप पावत चाललेल्या दुर्मिळ कलाकृतींचे, ऐतिहासिक वस्तूंचे जतन व्हावे यासाठी सासवड सांस्कृतिक मंडळाची स्थापना केली. सासवड नगरपालिकेला मार्गदर्शन करून देशात स्वच्छतेच्या बाबतीत नावलौकिक मिळवून दिला. संपूर्ण जग कोरोना काळात भयग्रस्त असताना ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून या दांपत्याने तालुक्यातीलच नव्हे तर येणारा प्रत्येक कोरोनाग्रस्त रुग्ण यांना आधार देत खळद येथे उभारलेल्या सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात सेवा करण्याचे काम केले. तालुक्यातील बहिरवाडी सारख्या गावाचे १०० टक्के लसीकरण करून देशात पहिला क्रमांक मिळविला. अशा सगळ्या व्यस्त व्यापातून आपल्या कुटुंबासमवेत वाढदिवस असो, दसरा-दिवाळी, गणेशोत्सव असे पारंपारिक सण साजरे करत आपली संस्कृती जपण्याचे काम आनंदाने करताना दिसतात.

“जे आहे ते समाजाचे नि जे करायचे ते समाजासाठीच ” या समर्पित भावनेने आपल्या पित्याप्रमाणे या युवा नेतृत्वाने मार्गक्रमण केले आहे. त्यांच्या सर्व कार्यात त्यांच्या मातोश्री आनंदीकाकी, ज्येष्ठ बंधू राजेंद्रजी जगताप (भा.प्र.से.), पत्नी राजवर्धिनीताई जगताप हे खंबीरपणे पाठीशी उभे आहेत. वर्तमानाकडून भविष्याकडे झेपावणाऱ्या या उत्तुंग व्यक्तिमत्वाला सर्वगुणसंपन्न, आधुनिकतेचे भान असणाऱ्या व आपल्या कर्तृत्वामुळे तालुक्याच्या हृदय सिंहासनावर विराजमान झालेल्या युवक नेत्यास दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना ।

शब्दांकन : श्रीकृष्ण नेवसे, सासवड

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top