वढू-तुळापूरला शंभुभक्तांकडून जयघोष

वढू-तुळापूरला शंभुभक्तांकडून जयघोष

Published on

कोरेगाव भीमा, ता. १ : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३३व्या मृत्युंजय दिनानिमित्त हेलिकॉप्टरमधून केलेली पुप्षपृष्टी, पोलिस दलाची मानवंदना, पालखीसोहळा, दिंड्या, मिरवणुका, समाधिस्थळी जलाभिषेक, व्याख्यान सभा अशा विविध कार्यक्रमांनी व शंभुभक्तांच्या जयघोषांनी वढू बुद्रुक येथील समाधिस्थळ परिसर दुमदुमला. दिवसभर श्रीक्षेत्र वढू बुद्रूक (ता. शिरूर) येथे राज्यभरातून अभिवादनासाठी आलेल्या शंभुभक्तांनी अलोट गर्दी केली होती.
वढू बुद्रूक येथे ग्रामपंचायत, ग्रामस्थ व धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सव्वाबाराच्या सुमारास समाधीस्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली. तसेच, तीन फैरी झाडून पोलिसांनी शासकीय मानवंदना दिली. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अ‍ॅड. अशोक पवार, अभिनेते प्रवीण तरडे, सविता बगाटे, पंडित दरेकर, वर्षा शिवले, प्रफुल्ल शिवले, अंकुश शिवले, सरपंच सारीका शिवले, स्मृती समितीचे सोमनाथ भंडारे, लक्ष्मण भंडारे, उपसरपंच हिरालाल तांबे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व शंभुभक्त उपस्थित होते. पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार समाधिस्थळी पोलिसांकडून शासकीय मानवंदनाही देण्यात आली.
दरम्यान संदीप भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले पुरंदर येथून वढू बुद्रुकला आणलेली धर्मवीर संभाजी महाराज पालखी, गोदाकाठ येथून आलेली धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानची पालखी, तसेच शिरूर-हवेली प्रासादिक दिंडीची संगमेश्वर ते वढू बुद्रुक पालखी, पुण्यातील हेडगेवार ज्योत, आईसाहेब आध्यात्मिक ज्ञान विज्ञान संस्था वाडेबोल्हाई यांची शिवनेरी ते वढू पालखी यासह राज्यभरातून आलेल्या शंभुज्योतींचे समाधीस्थळावर आगमन झाल्याने संपूर्ण परिसर शंभुराजांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावर्षी ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात येणारा स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पुरस्कार शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांना; तर स्मृती समितीच्यावतीने देण्यात येणारा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांना बालयोगी महाराजांच्या हस्ते देण्यात आला.

यावेळी खासदार कोल्हे म्हणाले, ‘‘पालकमंत्री अजित पवार यांनी दिलेला २५० कोटींचा निधी आमदार पवार यांनी पाठपुरावा करून ३०० कोटीवर नेला असून, येथे जागतिक दर्जाचे स्मारक व्हावे, याच दृष्टीने सर्वांचे प्रयत्न सुरु आहेत.’’ ‘‘नव्या पिढीला प्रेरणादायी स्मारकासह वढू-तुळापुरचा विकास हेच शंभूराजांना खरे अभिवादन ठरणार आहे,’’ असे आमदार पवार यांनी सांगितले. ‘‘गेली ७० वर्षे देशाचा खरा इतिहास आपल्यापासून लपवला जात असून, सध्याच्या कठीण काळात हिंदुराष्ट्र वाचवण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे,’’ असे कुलश्रेष्ठ यांनी सांगितले. गायत्री फरताळे हिने शिववंदना सादर केली.
पंचक्रोशीतील शंभूभक्तांच्या वतीने व धर्मवीर संभाजीराजे युवा मंचच्या माध्यमातून महाप्रसादाचे आयोजन केले होते. सायंकाळी धर्मवीर संभाजीराजे युवा मंचच्या माध्यमातून छावा या ऐतिहासिक नाटकाचे आयोजन केले होते. सरपंच सारीका शिवले यांनी स्वागत; तर अंकुश शिवले व सोमनाथ भंडारे यांनी प्रास्ताविक केले. हिरालाल तांबे यांनी आभार मानले. अमोल दरेकर व अशोक भंडारे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com