जिवंत पत्नीचा बनविला मृत्यूचा दाखला; पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime case
जिवंत पत्नीचा बनविला मृत्यूचा दाखला; पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल

जिवंत पत्नीचा बनविला मृत्यूचा दाखला; पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल

मंचर - जिवंत पत्नीचा (Wife) कोरोनाने मृत्यू (Corona Death) झाल्याचे दाखवून बनावट मृत्यूचा दाखला (Bogus Death Certificate) तयार करून अनामत रक्कम ठेव पावती रक्कमेचा अपहार केल्याचा प्रकार मंचर (ता. आंबेगाव) येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी पतीसह सासरचे पाच व मंचर ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी व एक महिला कर्मचारी, अशा एकूण सात जणांच्या विरोधात संगनमताने बनावट मृत्यूचा दाखला तयार करणे, अपहार व फसवणुकीचा गुन्हा (Crime) दाखल केला आहे.

याप्रकरणी घोडेगाव न्यायालयाच्या आदेशानुसार मंचर पोलिसांनी संबंधित महिलेचा पती गीताराम आबाजी पोखरकर (वय ३८), सासरे आबाजी लक्ष्मण पोखरकर (वय ६५), सासू ठकूबाई आबाजी पोखरकर (वय ६०), दीर गजानन आबाजी पोखरकर (वय ४२), नणंद शांताबाई बाळू नवले (वय ४४; सर्व रा. पिंपळगाव खडकी, ता. आंबेगाव), मंचरचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी के. डी. भोजने (वय ४७), मंचरच्या ग्रामपंचायत कर्मचारी स्नेहल स्वप्नील गुंजाळ (वय २६), यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: पुणे : जम्बो रुग्णालय पुन्हा कार्यान्वित करणार

मंचर येथील कुलस्वामी को. ऑफ क्रेडीट सोसायटीत ठेव पावतीची मुदत पूर्ण झाल्यामुळे ३९ हजार रुपये रक्कम काढण्यासाठी अक्षय मनकर व त्यांची बहिण आशा गीताराम पोखरकर या गेल्या होत्या. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्याने सांगितले की, आशा यांचा मृत्यू झाला असून, त्यांचे वारसदार पती गीताराम पोखरकर यांनी सदर रक्कम काढून नेली आहे. ते ऐकल्यानंतर अक्षय मनकर यांचा थरकाप उडाला. तसेच त्यांनी, ‘माझी बहीण आशा ही माझ्याबरोबरच आहे.’ असे सांगितले. त्यामुळे पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. त्यांनी आशा यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा मंचर ग्रामपंचायतीचा दाखला दाखविला.

मृत्यूचा खोटा दाखला तयार करून पतीनेच पैसे हडप केल्याचा दावा आशा पोखरकर यांनी घोडेगाव न्यायालयात दाखल केला. ॲड. विठ्ठल पोखरकर यांनी आशा यांच्या वतीने न्यायलयात युक्तिवाद केला. त्यानुसार न्यायालयाने संबंधित प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश मंचर पोलिसांना दिले. याप्रकरणी पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक राजेंद्र हिले हे पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा: इंदापूर : पोटच्याच मुलाने केली मातेची निर्घृण हत्या

माहेरहून पैसे आणण्यासाठीही छळ

आशा पोखरकर व गीताराम पोखरकर यांचा विवाह २५ मे २००५ रोजी झाला आहे. मनकर वस्ती-पारगावतर्फे खेड (ता. आंबेगाव) हे आशा यांचे माहेर आहे. विवाहानंतर काही वर्षानंतर पती दारू पिऊन आशा यांना शिवीगाळ व माराहाण करत होता. सासू, सासरे, दिर यांच्याकडूनही माहेरहून पैसे आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ झाल्याचे आशा पोखरकर यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punecrimeWifeArrested
loading image
go to top