
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी सात जागांसाठी चुरशीची लढत-PNE21R0345
पुणे, ता. २२ : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (पीडीसीसी) संचालक मंडळाच्या पंचावार्षिक निवडणुकीसाठी आता सात जागांसाठी चुरशीची लढत होणार आहे. बॅंकेच्या संचालकपदाच्या २१ जागांपैकी गुरुवारी अर्ज माघारीच्या अखरेच्या दिवसापर्यंत १४ जण बिनविरोध झाले आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा येत्या ४ जानेवारी रोजी होणार आहे.
जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक प्रकाश म्हस्के (हवेली), माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे (मुळशी), दिगंबर दुर्गाडे (पुरंदर), आमदार अशोक पवार (शिरूर), जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद (हवेली), राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश घुले, जिल्हा परिषदेच्या ज्येष्ठ सदस्या आशा बुचके (जुन्नर) आदी प्रमुख उमेदवारांसह संचालकपदाच्या सात जागांसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत.
जिल्हा बॅंकेच्या निवडणूक रिंगणातून माघार घेण्यासाठी गुरुवारी (ता.२३) दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम मुदत होती. या मुदतीत दिवसभरात ३४ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे आजअखेरपर्यंत १४ जण बिनविरोध झाले आहेत. तालुकास्तरीय अ वर्ग मतदारसंघाच्या १३ जागांपैकी १० जागा बिनविरोध झाल्या असून हवेली, मुळशी आणि शिरूर या तीन ‘अ’ वर्ग मतदारसंघांची निवडणूक लागली आहे. या तीनही मतदारसंघात दुरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिरूरमधून आमदार अशोक पवार यांच्या विरोधात आबासाहेब गव्हाणे, हवेलीतून प्रकाश म्हस्के (राष्ट्रवादी कॉंग्रेस) यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच विकास दांगट हे निवडणूक रिंगणात आहेत. मुळशी तालुका मतदारसंघातून आत्माराम कलाटे आणि राष्ट्रवादी कॉंगेसचे उमेदवार सुनील चांदेरे यांच्यात दुरंगी लढतीचा सामना रंगणार आहे. ‘क’ वर्ग मतदारसंघातून प्रदीप कंद (भाजप), सुरेश घुले व दिलीप मुरकुटे यांच्यात लढत होत आहे. ‘ड’ वर्ग मतदारसंघातून दिगंबर दुर्गाडे यांच्या विरुद्ध दादासाहेब फराटे हे निवडणूक लढवत आहेत.
महिलांच्या दोन जागांसाठी तिघींमध्ये लढत
जिल्हा बॅंकेच्या संचालकपदाच्या दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यासाठी तीन जणी निवडणूक रिंगणात उरल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन आणि भाजपच्या एका महिलेचा समावेश आहे. राष्ट्रवादी कॉंगेसच्या निर्मला जागडे व पूजा बुट्टे आणि भाजपच्या आशा बुचके यांच्यात लढत होणार आहे.