एसटी कर्मचाऱ्याच्या मृत्यूमुळे शिरूरला तणाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी कर्मचाऱ्याच्या मृत्यूमुळे शिरूरला तणाव
एसटी कर्मचाऱ्याच्या मृत्यूमुळे शिरूरला तणाव

एसटी कर्मचाऱ्याच्या मृत्यूमुळे शिरूरला तणाव

sakal_logo
By

शिरूर, ता. २९ ः एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळात निलंबित केलेल्या शिरूर आगारातील वाहकाचा शारीरिक अतिताणामुळे मृत्यू झाल्याने व त्यांचा मृतदेह आज (बुधवारी) शिरूर आगारात आणण्यात आल्याने बसस्थानक परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, संतप्त कामगारांना पोलिसांनी संयमाचे आवाहन केल्याने परिस्थिती निवळली.

अनिल धनवर सूर्यवंशी (वय ५७) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून, ते शिरूर आगारात वाहक म्हणून कार्यरत होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. कामावर हजर राहण्याची सूचना देऊनही ते हजर न झाल्याने त्यांना आगार प्रशासनाने निलंबित केले होते. सुनावणीसाठी त्यांना गुरुवारी (ता. २३) आगारात बोलावले होते. तथापि, प्रकृती अस्वास्थामुळे ते सुनावणीसाठी गेले नाहीत व त्याच दिवशी त्यांना शारीरिक त्रास झाल्याने उपचारार्थ खासगी रूग्णालयात दाखल केले होते. परंतु प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी ससूनला दाखल केले होते. तेथे उपचार चालू असताना मंगळवारी (ता. २८) रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.

आज सकाळी याबाबत माहिती समजताच संतप्त कर्मचारी बसस्थानक आवारात मोठ्या संख्येने जमा झाले. गोंधळाची परिस्थिती व अनुचित प्रकार टाळण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक किरण उंदरे, पोलिस उपनिरीक्षक स्नेहल चरापले, पोलिस उपनिरीक्षक विक्रम जाधव, पोलिस उपनिरीक्षक अभिजित युवराज पवार यांनी बसस्थानकावर पोलिस बंदोबस्त तैनात केला. राज्य राखीव पोलिस दलाची तुकडीही पाचारण केली. मृत कर्मचारी सूर्यवंशी यांचा मृतदेह आगारात आणून त्याला न्याय मिळण्यासाठी धरणे धरण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला होता. तथापि, सहायक पोलिस निरीक्षक उंदरे यांनी कामगारांशी चर्चा करून संयम राखण्याचे आवाहन केले. त्याला कामगारांनी प्रतिसाद दिला.

दुपारी बाराच्या सुमारास सूर्यवंशी यांचा मृतदेह घेऊन येणारी रुग्णवाहिका आगारात आणली त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. सूर्यवंशी यांच्या पत्नी अनिता; तसेच योगिता कोथिंबीरे व क्षितिजा पाचर्णे या मुली, जावई स्वप्नील कोथिंबिरे व अशोक पाचर्णे आदी यावेळी उपस्थित होते. दुःखावेगाने मुलींनी वडिलांच्या मृतदेहाला कवटाळत हंबरडा फोडला तेव्हा उपस्थित समुदायही हेलावला. कुटुंबीयांनी यावेळी संतप्त भावना व्यक्त केल्या. आपल्यातील एका कर्मचाऱ्याला एसटी कामगारांनी पुष्पहार अर्पण करून, दुःखद अंतःकरणाने श्रद्धांजली वाहून निरोप दिला. त्यानंतर मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आगार व्यवस्थापकांविरूद्ध तक्रार

एसटीचे मृत कर्मचारी अनिल सूर्यवंशी यांची मुलगी योगिता कोथिंबीरे यांनी याबाबत तक्रारी अर्ज दिला असून, त्यांनी आगार व्यवस्थापक महेंद्र माघाडे, सहायक वाहतूक निरीक्षक गणेश रत्नपारखी यांच्यासह प्रशासनावर आरोप केले आहेत. प्रशासनाच्या मानसिक त्रासामुळे वडील डिप्रेशन मध्ये गेल्याचे त्यांचे म्हणणे असून, त्यांच्या तक्रार अर्जानुसार चौकशी केली जाईल. यात दोषी आढळणारांविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सहायक पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांनी सांगितले.

अनिल सूर्यवंशी या कर्मचाऱ्याच्या मृत्युप्रकरणाची शासनाने गंभीर नोंद घ्यावी व त्यांच्या मृत्यूला जबाबदार व कारणीभूत असणारे प्रशासकीय अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. या कामगाराचा मृत्यू दोन दिवसांपूर्वीच झाला असल्याचे कामगारांचे म्हणणे असून, केवळ अधिवेशन काळात गोंधळ होऊ नये म्हणून शासन यंत्रणेने हा प्रकार दाबला. त्याचीही वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी.
-संजय पाचंगे
अध्यक्ष, भाजप कामगार आघाडी, पुणे जिल्हा

ID: PNE21S31444
ID: PNE21S31438

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..