
गुलाबी थंडीत तापतेय राजकीय वातावरण-PIM21B0945
कामशेत, ता. १५ : कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले, त्यात निवडणुकीचे पडघम वाजू लागले. त्यामुळे इच्छुकांनी त्याच क्षणापासून मतदारराजांची मनधरणी सुरू केली. मतदारराजाची मनधरणी करता करता, पक्षीय नेतृत्वाचे लक्ष वेधण्यासाठी शक्तिप्रदर्शन सुरू झाली. शक्तिप्रदर्शनाच्या स्पर्धेला मावळ उधाण आले असून, वेगवेगळ्या इव्हेंटने गुलाबी थंडीत राजकीय वातावरण गरम होऊ लागले आहे.
मावळातील गरम झालेले राजकीय वातावरण गण आणि गट निश्चित नंतर अधिक तापणार असे चित्र दिसतेय. राजकीय महत्वाकांक्षा असलेली तरुण पिढी तीन चार वर्षांपासूनच सक्रिय झाली असून, जनसंपर्काची कोणतीच संधी ही मंडळी सोडताना दिसत नाही. कोरोनाच्या काळातही या तरुण मंडळीनी अन्नधान्याचे कीट वाटप, सॅनिटायझर वाटप, जनजागृती, मोफत मास्क वाटप असे उपक्रम राबविले.
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळवून देणे, रेमडेसिव्हिर,प्लाझ्मा मिळवून देणे अशी कामे करीत सामाजिक जबाबदारीचे कामेही या तरुण पिढीनी हाती घेतली होती. अगदी वाडी वस्तीवर जाऊन या मंडळीनी पुणे-मुंबई शहरातून आलेल्या ग्रामस्थांना विलगीकरण करण्यातही सिंहाचा वाटा उचलून मदतीचा हात पुढे केला. कोरोना लसीकरणासाठी स्वखर्चाने नागरिकांच्या येण्या जाण्याची सोय केली. सरकारी दवाखान्यात सेटिंग लावून गर्दीतही मतदार राजाला कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून दिले. कोरोना महामारीच्या संकटात ही मतदारराजाच्या मदतीला आलेली तरुण पिढी कोरोना नियम शिथिल झाल्यावर घरात कशी बसून राहील. कोरोना नियमांचे पालन करीत नव्या इव्हेंटसाठी ही मंडळी सरसावली आहे.
सध्या मावळ तालुक्यातील कोणकोणत्या गावात, भागात कोणता ना कोणता इव्हेंट असतोच. मग तो वाटप सोहळा असेल, विविध स्पर्धा असतील, देवदर्शन सहली असतील, समुद्र किनाऱ्यावर फिरणे असेल किंवा कीर्तन महोत्सव असतील. यात मावळचा मतदार राजा डुबकी घेत आहे. एकूण मतदानाच्या साठ ते सत्तर टक्के मतदानात तरुण वर्ग आणि महिला वर्ग असल्याने हाच मतदार डोळ्यासमोर ठेवून इव्हेंटची रचना केली जात आहे.
तीर्थक्षेत्रांमध्ये सहली
आज महालक्ष्मी मंदिरात दर्शन तर उद्या तुळजापूरला भवानी मातेचे दर्शन, येडेश्वरीचे दर्शन, कधी पंढरपूरला पांडुरंगाचे दर्शन, कधी थेट तिरुपतीला बालाजीचे दर्शन या इव्हेंटला महिला मंडळी मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहे. तरुण पिढी कोकण वारी करून आलेत, वारकरी पंढरपुरात जाऊन आले. निवडणूक मावळात पंचायत समितीच्या गणाची किंवा जिल्हा परिषदेच्या गटाची. पण या निवडणुकीचे आराखडे कोल्हापुरात जाऊन बांधले जात आहे. होममिनिसटर, आरोग्य शिबिरे, वाढदिवसानिमित्त स्नेह मेळावे अशा एक ना अनेक इव्हेंटची रेलचेल सुरू आहे,
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..